Saturday, August 4, 2012

Kahi Goshti Haravu Nayet Mhanun - 4

ही वेळ निघून जाईल...

फार वर्षां पूर्वीची गोष्ट आहे. विक्रमादित्य नावाचा राजा कपिला नगरीवर राज्य करत होता.

राजा मोठा धर्मशील होता. पराक्रमी होता. आपल्या प्रजेवर त्याचे निरातिशय प्रेम होतं. नागरी मधेही सगळेच अलबेल होते. सुख, समृद्धी, शांती आणि समाधान सगळी कडे नांदत होते. प्रजेलाही राजाविषयी प्रेम आणि आदर होता. राजाची सुंदर सत्वशील  पत्नी, एक उमदा राजपुत्र, गोंडस राजकुमारी... असं अगदी दुष्ट लागण्या सारखं सगळं चाललं होतं. त्यामुळे राजाही खुश होता.

एके दिवशी तो विचार करतो की 'सगळ उत्तम चाललय तर प्रजेला एक छानशी मेजवानी द्यावी आपण... आपलं प्रजेवरच प्रेम व्यक्त करायला ह्याहून चांगला उपाय नाही आणि खरतर आपल्याकडे कारण ही आहेच की... पुढच्याच मासात आपला जन्मदिवस आहे'.

तो राणीशी बोलतो आणि मेजवानीचा बेत पक्का ठरतो... नगरीत सर्वदूर आमंत्रणं जातात. राज्यातला सर्वांना अगदी झाडून निमंत्रणं जातात. इकडे राजमहालही मेजवानी साठी चांगलाच सजतो. उंची शामियाने उभारले जातात... देशविदेशातून नामांकित आचारी बोलावले जातात... सगळी कडे जणू उत्सवाचं वातावरण असतं.

आणि अखेरीस मेजवानीच दिवस उजाडतो. गावातील लहाना पासून वृद्धापर्यंत, राव पासून रंका पर्यंत आणि मूढा पासून योगी ऋषींपर्यंत सगळे जातीनं हजर असतात... सगळ्यांनी आपल्या लाडक्या राजाला त्याच्या वाढदिवसाची काहीना काही भेट आणलेली असते. राजा खूप प्रेमानी सगळ्यांची भेट स्वीकारतो... सगळ्यांना जेवून जाण्यास सांगतो आणि जातीनं प्रत्येकाला हवं नको ते पाहतो... बेत फक्कडच असतो. सगळे पोटभर जेऊन, तृप्तं होऊन, राजाला अनेकानेक आशिर्वाद, शुभेच्छा देऊन आपापल्या घरी निघून जातात.

सगळे गेल्यावर राजा राणी एक एक करून भेटवस्तू पाहू लागतात. प्रत्येकानी आपापल्या ऐपतीप्रमाणे राजाला फुल ना फुलाची पाकळी भेट म्हणून दिलेली असते. प्रजेचं  त्याच्याविषयीचं प्रेम पाहून राजाही खूप खुश होतो. आणि तेवढ्यात राजाची नजर गावाबाहेरच्या एका साधूने दिलेल्या भेटवस्तू कडे जाते. ती एक पाटी  असते. त्यावर एक वाक्य कोरलेलं असतं "ही वेळ निघून जाईल".

तत्क्षणी राजाचा चेहेरा बदलतो. रागानी तो अक्षरश: थरथरू लागतो. गावाबाहेरच्या त्या साधूचा त्याला प्रचंड राग येतो. इतकं सगळं छान चालू आहे, ऐश्वर्य आहे आणि हा नीच साधू म्हणतो हि सुखाची वेळ निघून जाईल? काय म्हणावं काय अश्या माणसाला...??? हा साधू नाहीच.  नक्कीच कोणीतरी भोंदू बाबा असणार.

लगेचच राजाचा हुकुम सुटतो, "जिथे असेल तिथून त्या  साधूला कैद करा आणि कारागृहात डांबून ठेवा". झालं राजाच्या इच्छे प्रमाणे होतं. त्या साधूची बाजू ऐकूनही न घेता, त्याला सरळ कारागृहात डांबलं जातं.

अशीच काही वर्ष सुखा समाधानात जातात. राजा त्या साधू आणि  त्या पाटी बद्दल पूर्ण विसरलेला असतो. पण नियतीच्या मनात काही वेगळच असतं  . राजाच नशीब पालटतं. कपिला  नगरीवर भयंकर दुष्काळाच सावट पसरतं. नगरीतल्या नद्या आटतात, विहिरी कोरड्या पडतात, सगळी पिके करपून जातात. राजा आपले धान्यागार प्रजेसाठी रिते करतो. प्रजेसाठी नव्या विहिरी खोदतो. त्यावर्षी कसेबसे भागते पण पुढच्या वर्षीही  तीच परीस्थिती... आता राजा कडे पर्याय नसतो. राजा आपला सगळा खजिना रिकामा करतो आणि परराज्यातून अन्यधान्य आणि पाण्याची व्यवस्था करतो.

इकडे आसपासच्या राज्यांना कपिला नगरीची ही अवस्था कळते. राजाचा वाईट काल आल्याचे पाहून एरवी राजाचे नाव काढताच ज्यांची पाचावर धारण बसायची असे कपिला नगरीच्या आसपासचे छोटे राजे डोकी वर काढायला लागतात. कपिला नगरी गिळंकृत करण्याच्या उद्देशाने चोहोबाजूनी परकीय आक्रमणे होतात.  दुष्काळानी आधीच संत्रस्त झालेले सैनिक तरी किती तग धरणार? अती बलाढ्य अश्या कपिला नगरीचा सपशेल पाडाव होतो. राणीला, राजपुत्राला आणि राजकन्येला कैद करून इतर राजे घेऊन जातात. राजा पार देशोधडीला लागतो. नियतीचे फासे फिरले कि असेच व्हायचे.

राजा विमन्सक अवस्थेत रानोमाळ भटकत असतो. त्याला काय करावे ते सुचत नसते. गेलेले वैभव आपला परिवार कसा परत मिळवावा ते काळात नसते. त्याला उमगत नसते की आपण असे काय पाप केले म्हणून आपल्यावर ही वेळ आली? हा कसला शाप भोगतोय आपण?

यातून काहीच मार्ग दिसेना तेव्हा राजाचे मन कलुषित व्हायला लागते. तो विचार करतो, की अश्या लाचारीच्या जगण्यापेक्षा मरण बरे. राजा इतका हताश होतो की आत्महत्येचे विचार राजाच्या मनात येऊ लागतात आणि त्याच्यावर तो अंमल करायला ही निघतो.

कपिला नगरीच्या उंच पर्वतशीखरावरून तो उडी मारणार तेवढ्यात गावा बाहेरच्या त्या साधूने दिलेल्या त्या पाटीची त्याला आठवण होते. "ही वेळ निघून जाईल". हे वाक्य वाचून तेव्हा केवढा राग आला होता राजाला पण आता  हेच  वाक्य राजाला कमालीची उभारी देऊन जाते - "ही वेळ निघून जाईल". किती योग्य आहे हे वाक्य. राजाला मनोमन पटते जसा चांगला काळ राहिला नाही तसा हा वाईट काळही राहणार नाही. राजाच्या अंगात नवीन उत्साह संचारतो आणि त्याला त्याची चूक कळते. काहीही ऐकून न घेता आपण त्या साधूला कैदेत टाकले. पण आता ही वेळ पश्चातापाची नाही तर कृतीची  आहे. आपले राज्य, आपले गातवैभव आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे आपले कुटुंब परत मिळवायलाच पाहिजे असे राजा पक्के मनाशी ठरवतो.

ब्राह्मण वेशात राजा नगरीत राहायला लागतो आणि हळू हळू आपल्या जुन्या सैन्याशी संपर्क करतो. त्या पुण्यश्लोक राजाला मदत करायला कापिलावासी आनंदानी होकार भारतात. राजा सर्व तयारीनिशी जेत्या राजांवर आक्रमण करतो. सगळे पराक्रमाची शर्थ करतात आणि हळू हळू कपिला नगरी परकीय राजवटीतून मुक्त होते.

राजाला त्याचे गतवैभव, कुटुंब सर्व परत मिळते. तो कैदेतून त्या साधूला बाहेरकाढतो त्याची मनापासून माफी मागतो, त्याचा यथायोग्य सत्कार करतो आणि मोठ्या सन्मानी त्याला परत पाठवतो.

आणि आता अजून तरी राजाची सुखाची वेळ निघून गेलेली नाही.