Showing posts with label Stories. Show all posts
Showing posts with label Stories. Show all posts

Thursday, January 5, 2023

छोट्या सादर कर्त्यांसाठी...

 माझा मुलसाठी - अर्हतसाठी - शाळेत, वेगवेगळ्या स्पर्धांमधील सादरि‍करणासाठी जस जसे लिहित जाईन तस तसे इथे जोडत जाईन...

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पपेट शो - ईस्रो चले हम!


लिखाण वर्षः  सप्टेंबर २०२३

सादर कर्त्यांचे वयः ६ - ७ वर्षे 

सादरि‍करणास लागणारा वेळः ४ -४.५ मिनिटे


Image curtesy: compiled from web

(छोटाभीम च्या गावाचा देखावा असलेला पडदा असतो. त्यावर, खालील गाणी म्हणत एक एक पपेट अवतरतात)

छोटा भीमः    भीम भीम भीम… छोटा भीम छोटा भीम… (२ वेळा)

स्पायडरमॅनः    स्पाडरमॅन स्पाडरमॅन… डज व्हॉटेवर अ स्पाडर कॅन… (२ वेळा)

डोरेमॉनः       कम इन थ्रू द मॅजिक डोअर… कम अँड मीट डोरेमॉन… (२ वेळा)

             (जॅपनीज पद्धातीने मान झुकवुन) कोनीचीवा छोटा भीम… Hi!

छो.भी.        आईशप्पथ! नमस्कार डोरेमॉन!

स्पाः          (हस्तांदोलन करून) Hey man! Hello!

छो.भी.:        (प्रवीण तरडे शैलीत) आयायायायाया…. नमस्कार स्पायडऱ्या!

डो.:           स्पायडरमॅन तू इथे!

स्पा.:         डोरेमॉन, तू पण इथे!!

छो.भी.:       अरे, हा प्रश्ण तर मी तुम्हाला विचारायला पाहीजे! डोरेमॉन तू जपानहून आणि   स्पायडरमॅन तू यू.एस.ए. हून इथे भारतात काय करताय!

स्पा.:         अरे काय करतोय म्हणजे काय? तुमच्या ईस्रोनी कामच तस केलय ना भावा!

डो.:           हो रे! आम्ही जॅपनीज लोक अजूनही आमचं यान चंद्रावर उतरवू शकलो नाहीयोत!

छो.भी.:        खरं यार! ईस्रोचे शास्त्रज्ञ भाररीचेत!

स्पा.:         नक्कीच! भारत हा जगातला ४था देश आहे चंद्रावर पोचलेला!

डो.:           आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचलेला पहीला देश!

छो.भी.:        ते ही खूप कमी खर्चात!

तिघेः         पार्टी ना भो!!!

स्पा.:         म्हाणूनच तर आम्ही ईस्रो बघायला आलोय!

छो.भी.:       अरे आमच्या इथले हुशार हुशार विद्यार्थी अमेरीकेला, जपानला जातात आणि तुम्ही   इकडे आलायत!

डो.:          मित्रा तुमच्या ईस्रोनी कामच असं झकास केलय की काय सांगू… एकदम खास! चलाना   यार, आपण सगळे ईस्रोत जाउन बघू अजून काय काय करणार आहेत ते!

(ईस्रोशी निगडीत चित्रे असलेला पडदा पडतो तेव्हा स्कूल चले हम च्या चालीत…)

स्पा.:         डोरेमॉन को लेकर…

डो.:          स्पायडरमॅन को लेकर…

छो.भी.:       ईस्रो चले हम!

(ह्याच ओळी पुन्हा म्हणतात तोवर ईस्रोचा पडदा खाली आलेला असतो)

स्पा.:         तर आता चंद्रयान ३ नंतर पुढे काय?

डो.:          आदित्य एल१ सुर्याचा आभ्यास करायला आत्ताच गेलय!

छो.भी.:       त्यानंतर गगनयान!!! भारत पहील्यांदाच अवकाषात माणूस घेउन जाणार!

स्पा.:         मग मंगळयान २, चंद्रयान ४, शुक्रयान १ अशी लाईनच आहे की भावा!

डो.:          हो रे! म्हणजे भारतातल्या हूशार हूशार विद्यार्थ्यांना ईस्रोतच ररग्गड काम आहे की!

छो.भी.:       ह्म्म्म!! मी ठरवलय! भरपूर आभ्यास करायचा, IISc, IIT मधे जायचं आणि माझ्या   भारत देशात राहूनच, भारतासाठी, ईस्रोसाठी काम करायचं!

स्पा.:         आणि असं झालं तर तुम्हीच काय पण आमच्या यू.एस.ए. आणि जपानचे शास्त्रज्ञही   भारतात येऊन काम करतील!

तिघे:         (आनंदून) सही!!!

             चंदामामा दूर के…

             लल लल लल लाला…

             अब एक छोटी टूर के…

             लल लल लल लाला…

             ईस्रो के सांयटीस्ट महान हैं! (२ वेळा)

             भारत मॉंकी शान हैं! (२ वेळा)

             शान हैं भाई शान हैं!... (२ वेळा)

             लल लल लल लाला… (३ वेळा)

 

----------------------------- समाप्त-------------------------------



नाट्यछटा - निरोप

लिखाण वर्षः २०२२

सादर कर्त्याचे वयः ६ - ७ वर्षे 

सादरि‍करणास लागणारा वेळः ४ मिनिटे


Image curtesy: https://www.udayavani.com/english-news/ravi-jadhav-to-direct-historical-film-bal-shivaji 

मा‍झ्या प्रिय सौंगड्यांनो, आज निरोपाचा दिवस. औसाहेब म्हणतायत, आज मावळातून मुक्काम हलवायला लागणार आम्हाला. नाहीतर आदिलशाही फौजा हल्ला करतील.

अरे… अरे असे खट्टू नका होऊ. आम्हाला ह्या गावाहून त्या गावी फिरत राहावं लागतय खरं, पण औसाहेब म्हणतात, “शिवाजीराजे, आपल्या वडीलांनी – शहाजीराजांनी मुघल फौजेला परतवून लावलं, की थांबेल हो, आपली परवड. पण असा विचार राजे की तुम्हाला अवघ्या ५ – ६ वर्षांच्या आयुष्यात, आपला महाराष्ट्र फिरता येतोय. कुणाला मिळतं सांगा असं सौभाग्य?”

आणि खोटं का आहे ते दोस्तांनो? आता हेच बघा, हणम्याच्या घरची कांदाभाकर, परसूच्या दारात आपण केलेला किल्ला, नाम्याच्या रानातला विटी-दांडूचा खेळ, वाघाची हुबेहूब डरकाळी काढणारा जन्या, हे हे सगळं, आम्ही इथे आलोच नसतो तर कसं मिळालं असतं आम्हाला?, सह्याद्रीचे वेगवेगळे डोंगर कसे फिरलो असतो आम्ही? तुमच्या सारखे सौंगडी कसे मिळाले असते?

काय़ म्हणता? आम्ही विसरू तुम्हाला? मुळीच नाही… आमच्या मागच्या मुक्कामाचे वेगवेगळे दोस्त – तानाजी, येसाजी, बाजी सारे याद आहेत आम्हाला आणि आम्हाला विश्वास आहे – त्यांनाही असू आम्ही याद.

पण इथून जाताना मात्र तुमच्या कडून एक वचन हवय आम्हाला. द्याल आम्हाला ते वचन?

तिन्ही सांजेला दिवेलागण झाली की औसाहेब ज्या गोष्टी आम्हाला सांगतात त्या आम्ही तुम्हाला सांगितल्या. आम्हाला वचन हवय तुम्ही त्या गोष्टी नाही विसरायच्या. रामाचा पराक्रम, श्रीकृष्णाचं धैर्य ध्यानात ठेवायचं. अन्याय सहन न करणाऱ्या पांडवांची गोष्ट, भिमाची विरता विसरायची नाही. औसाहेब म्हणतात त्यांचे हेच गुण आपल्या सगळ्यांमधे आहेत. आम्हाला वचन हवय तुम्ही हे सगळं विसरणार नाही.

आपलं हे गाव मोठं थोर, समर्थ रामदास इथे येऊन गेले. त्यांनी तुम्हाला कसरती, व्यायाम करायला सांगितलाय. आपले मराठावीर हे श्रीमारुतीराया सारखे धष्टपुष्ट, बलदंड झाले पाहीजेत. असं ते म्हणाले होते. हो ना? आम्हालाही अगदी हेच वाटतं. तेव्हा आम्हाला वचन द्या की आपली परत भेट जेव्हा होईल तेव्हा आमचा प्रत्येक दोस्त भिमाचा अवतार असला पाहीजे. कराल आमच्यासाठी हे?

आणि हो, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा देवळा-रावळांमधे जा. ज्ञानदेवांचे अभंग गा, तुकाराम महाराज कधी आले तर त्यांचं किर्तन ऐका. औसाहेब म्हणतात कनवाळू विठुराय जसा आपला देव तसा महाभयंकर नृसिंहही! ह्या आपल्या देवांची लाज आपणच तर राखायची ना!

तेव्हा आता आपली परत भेट होईपर्यंत हे सगळं विसरायचं नाही!! आणि बोला – हर हर महादेव… जय भवानी!!!

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


बडबडगीत - नकोच तो मोबाईल

लिखाण वर्षः २०२१

सादरकर्त्याचे वयः ५ - ६ वर्षे 

सादरीकरणास लागणारा वेळः १ - २ मिनिटे


Image Curtesy: https://www.vecteezy.com/vector-art/5112696-cartoon-mobile-phone-mascot-pointing-up

मोबाईल बघायचा नाही असं ठणकावून सांगतो बाबा (२)

तू ही बघतोस म्हणलं तर होतो कावरा-बावरा!

म्हणतो कसा झंप्या भावड्या, लहानेस ना तू, (२)

डोळे तुझे नाजुक अजून येईल पाणी खूप

त्याचे म्हणे डोळे झालेत, खूप खूप स्टॉंग (२)

चष्म्या शिवाय तरी त्याचं होत नाही काम (२)

मला मात्र बाबासारखा नक्को मुळ्ळीच चष्मा, (२)

मोबाईल जरी नसला तरी चालेल मग मला! (२)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, July 8, 2020

"केल्याने होत आहे रे" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी – ८

सत्य घटनेवर आधारीत...

"केल्याने होत आहे रे" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी – ८

फक्त अग्नेय आणि पुर्व ऑस्ट्रेलीयाच्या नीलगीरीझाडांच्या जंगलात आढळणारा नीर्जल्या किंवा कोअला हा प्राणी. हा जरी छोट्या अस्वला सारखा दिसत असला तरी तो पोटाबाहेर पिशवी असणा-या कांगारू सदृश प्रजातीतला जीव. ह्या पिशवीचा उपयोग अविकसीत अभ्रकांना वाढवायला हे जीव करतात. पण सबंध आयुष्य अत्यंत कमी पौष्टीक आणि विषारी अशी नीलगीरीची पानं खाऊन पोषणमुल्य आणि उर्जे अभावी सुस्तावलेले हे जीव दिवसातले १८-२० तास झाडांच्या बेचक्यात झोपून काढतात. नीलगीरीचा फायदा एकच की त्या पानांमधून त्यांची तहानही ब-याच अंशी भागते. त्यामुळे झांडांवरून अगदी क्वचीतच खाली उतरून पाणी प्यायची ह्यांना गरज लागते. म्हणूनच ऑस्ट्रेलीयन आदीवसींनी त्यांचं नाव ठेवलं – कोअला कींवा नीर्जल्या अर्थात पाणी न पीणारा जीव. प्रत्येक नीर्जल्याला सुखेनैव जगण्यासाठी साधारणतः शंभर-एक नीलगीरीची झाडं लागतात त्यामुळे कळपात न राहाता एकलकोडं जीवन ह्यांना फार प्रीय असतं.

तर अश्या ह्या नीर्जल्याची ही गोष्ट. ऑस्ट्रेलीयाच्या अ‍ॅडलेड शहराच्या आसपासच्या जंगलातली. ऑस्ट्रेलीया हा मुळातच बराचसा वाळवंटी प्रदेश. त्यातूनही डिसेंबर ते फेब्रुवारी महीन्यातला उन्हाळा महाकठिण. तापमानाचा पारा सहज चाळीशी ओलांडतो आणि वाळलेल्या शुष्क जंगलातून दरवर्षी नित्यनेमाने वणवा पेटतो. म्हणूनच तिथले लोक उन्हाळ्याला ‘काळा उन्हाळा’ म्हणतात. पण २०१९च्या डिसेंबर महीन्यातला तो वणवा शमण्याचं नावच घेत नव्हता. लाखो वर्ग किलोमीटरचा प्रदेश अग्नीच्या भक्षस्थानी पडला होता. जंगलं तर वाचली नव्हतीच पण कित्येक छोटी-मोठी गावं, शहरं गीळत तो अग्नीचा तांडव चालला होता.

Pic Credit: https://images.app.goo.gl/wivo5UysA51WoSht9 

बघता बघता ही आग अ‍ॅडलेडशहरा भोवतीच्या जंगलात पोहोचली. कित्येक प्राणी जळून होरपळून मरत होते. काही तासातच ही आग एका निर्जल्याच्या नीलगीरीच्या झाडापर्यंत पोचली. जात्याच सुस्त आणि आळशी अश्या त्या निर्जल्याला साक्षात मृत्यू समोर दिसत होता. आता त्याच्या पुढे दोन पर्याय होते. एक म्हणजे स्वभावला अनुसरून, इतर ब-याच निर्जल्यांप्रमाणे न हालता आहे त्याच झाडावर बसून मरणाला कवटाळायचं कींवा स्वभावा विरूद्ध, वेगानं हालचाल करीत ह्या झाडावरून खाली उतरायचं आणि दुस-या सुरक्षीत झाडावर जायचं. खाली उतरण्यातही धोका होता. कारण वणव्यानी उपाशी, चिडलेले, घाबरलेले अनेक मांसाहारी प्राणी, पक्षी आयत्या शिकारीकडे डोळे लावून बसलेले असणार. पण काहीही न करता स्वस्थ बसणं त्याला पटत नाही आणि वेगानं तो झाडावरून खाली उतरतो, वेगानं पळत दुरचं झाड गाठतो आणि वेगानं त्या झाडावर चढतो. प्राणावर बेतल्यावर का होईना, वेग हे नवं कौशल्य त्यानी आत्मसात केलेलं असतं.

Pic Credit: https://images.app.goo.gl/rzYhqZiyYWzn6YRn8

पुढचे बरेच दीवस असाच झाडं बदलत, झोप कमी करून अधिक सतर्क राहाण्याचं कौशल्य अंगीकारून तो वाचतो. पण वणवा काही शमण्याचं नाव घेत नसतो. कोरडी झाडं, सुकलेली पानं, अटलेले जल स्त्रोत असं विदारक दृश्य सगळीकडे असतं. अन्नावाचून अजून काही दिवस आपण जगू शकू, पण पाण्यावाचून अजून फार काळ तग धरता येणार नाही हे त्याला अगदी पक्क उमगतं. अत्यंत कमी पाणी पिऊन दिवस काढणा-या त्याला स्वतःच्या तहाने विषयी कदाचीत पहील्यांदाच इतक्या प्रकर्शाने जाणीव होत असते आणि त्याच बरोबर त्याला अजून एक जाणीव होते ती म्हणजे पाणी पिण्या साठी आता नवे कौशल्य आत्मसात करावे लागणार ही.

जंगलातले पाण्याचे सगळे स्त्रोत आटलेले असताना पाणी कसं मिळवावं ह्या विचारात असतानाच तो बसलेल्या झाडाखाली जंगलातून जाणा-या रस्त्यावर काही सायकलस्वार त्याला दिसले. बारकाईनं निरिक्षण केल्यावर त्याला दिसलं की ह्या सायकल्स्वरांना दम लागला की ते थांबतात आणि त्यांच्याकडे असलेल्या बाटलीतून पाणी पितात. आता त्यानी – एकलकोंडं आयुष्य पसंत करणा-यानी – आपल्या स्वभावा विरुद्ध वागण्याचं कसब अंगीकारून माणसांकडूनच मदत मागायचं ठरवलं. आधिच सुस्त असणा-या ह्या प्राण्यांना माणसाने शिकार करून, त्यांचा आवास असणारी जंगलं कापून नामशेष प्रजातींच्या यादीत सामील करून टाकलय. तर अश्या आपल्या प्रजातीच्या –हासास कारणीभूत असणा-या माणसावर इतका सहज विश्वास टाकणं हे त्याच्या जनुकीय आठवणीला पटत नव्हतं, पण त्याशिवाय त्याच्याकडे गत्यंतरही नव्हतं.

तो सावधपणे झाडावरून खाली उतरतो आणि रस्त्याच्या कडेला येऊन बसतो. योगायोगाने तिथून काही सायकलस्वार जात असतात. त्या निर्जल्याला रस्त्यावरून कुठल्यागाडी खाली येऊ नये म्हणून सुरक्षित स्थळी हालवावं ह्या विचाराने ते सायकलस्वार त्याच्या जवळ थांबतात. हीच नामी संधी साधून तो निर्जल्या अ‍ॅना नावाच्या एका स्त्री सायकलस्वाराकडे झपझप येतो आणि तीच्या सायकलवर चढतो. त्याचा एकूण अवतार बघून त्याला तहान लागल्याचं संवेदनशील अ‍ॅनाच्या लगेच लक्षात येतं. स्वतःच्या पाण्याच्या बाटलीने ती त्या तहानलेल्या जीवाला पाणी पाजते. दुस-या सायकलस्वाराची पाण्याची बाटली संपवल्यावर कुठे त्या निर्जल्याची इतके दिवसांची तहान शमते आणि त्या नीरागस निर्जल्याच्या जनुकीय आठवणीत माणसाच्या संवेदनशीलतेची भर पडते आणि नवनवीन कौशल्य शिकून जीव वाचू शकतो ह्याची पण!

 

Pic Credit: https://images.app.goo.gl/9JXWHNvnRLPmsqhN8


तात्पर्यः १. कठीण परीस्थीतीवर आपल्या कौसल्यांमधे वाढकरून मात करतायेते.

      २. सखोल निरीक्षण आणि सतर्कतेने मोठ्या मोठ्या समस्या सुटु शकतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निर्जल्या सायकलस्वारा कडून पाणी पीताना

Wednesday, June 24, 2020

"सरळ वाट वहीवाट धरावी" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी – ७

"सरळ वाट वहीवाट धरावी" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी – ७


Pic Credit:https://images.app.goo.gl/dVoUxNpQBEc1DA7N8


आफ्रिकेतल्या टांझानिया देशातल्या सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यानाचा उत्तरेकडचा भाग. जुलैचा महीना होता. डोक्यावर सुर्य आग ओकत होता. दरवर्षी प्रमाणे सेरेंगेटीच्या मैलोंमैल लांब पसरलेल्या कुरणांवरचं गवत सुकुन चाललं होतं. पाण्याचे स्त्रोतही आटून कोरडे पडले होते. सेरेंगेटीच्या गवतावर पुष्ट झालेल्या लाखो झिब्रा, हरणं आणि विल्डबिस्टस् – रानगुरांना आता वेध लागले होते ते केनियाच्या मसाईमारा राष्ट्रीय उद्यानावर येणा-या पावसाचे आणि पावसामुळे उगवणा-या कोवळ्या लुससुशित गवताचे. केनिया आणि टांझानिया या दोन देशांमधे पसरलेल्या विस्तृत जंगलांमधून पावसाचा वेध घेत घड्याळ्याच्या दिशेत कोवळा चारा शोधत हे तृणभक्षी फिरत असतात. पण जुलै – ऑगस्ट महीन्यात टांझानियातून मारानदी ओलांडून केनियात होणारं त्यांचं महास्थलांतर हे विषेश करून रोमहर्षक आणि जोखमीचं असतं.


Pic Credit: Link Lost

आपल्या आईच्या देखरेखीतून अत्ताच सुटलेल्या तरुण नील-रानगुराच्या मनात मगच्यावर्षीच्या महास्थलांतरानी दिलेल्या जखमामात्र अजूनही तशाच ताज्या असतात.


----एक वर्षापुर्वी----


जुलैमहीन्यातली मध्यान. सुर्यकिरण सेरेंगेटीचं सगळं मैदान भाजून काढत होते. मारानदीच्या किनारी एका अगदी कमी ऊंचीच्या पठारावर लाखोंच्या संख्येनी रानगुरांचे तांडे थांबले होते. ऐलतीरी उन्हाचा राप; ही नदी ओलांडायची आणि पैलतीरी पावसाचा प्रदेश. पण एवढी गुरं एकत्र असूनही सगळीकडे नीश्चलता. नीरव शांतता. हवेत जाणणवणारा एक विचित्र ताण. धास्ती, भिती. कारण इथून पुढे प्रत्येक पावलावर साक्षात मृत्यु आ-वासून थांबलेला. नदीत रानगुरांच्या मेजवानी साठी पाण्यात लपून बसलेल्या अगणित मगरी, पलीकडे मोक्याच्या ठिकाणी दबा धरून बसलेले अनेक सिंह, बिबटे आणि तरस आणि झालच तर मारानदीचा जीवघेणा आवेग, पाण्यातले भोवरे. उतरायचं तरी कसं, कुठुन आणि कोणी?

Pic Credit: https://www.behance.net/gallery/51899903/go2Africa-The-Great-Wildebeest-Migration

कितीतरी वेळ असाच जातो. कोणीच नदीत उतरायला तयार नसतं. रानगुरांच्या त्या जथ्थ्यात मधोमध कुठेतरी उभं राहून आपल्या आई आणि भावंडां सोबत एक कुमार नील-रानगुर ही तगमग अनुभवत असतो. हे सगळं काय चाललय हे कळायच्या आत, एक रानगुर मारानदीत स्वतःला झोकून देतं आणि बघता बघता रानगुरांच्या झुंडीच्या झुंडी पाण्यात उड्या टाकतात. मागे थांबलेल्या गुरांचा रेटा एवढा जबरदस्त असतो की ते नील-रानगुरांचं कुटुंब आपोआप पुढे ढकललं जातं. आता वेग आणि नशिबच काय ते तारून नेणार होतं.

त्यांच्यापैकी कित्येक रानगुरं अगदी सहज आधाशी मगरींच्या भक्षस्थानी पडतात, किडे मुंग्या मरावेत तसे हे कित्येक किलोंचे रानगुर मगरी जबड्यात पकडून, पाण्यात चाकासारखं गोल गोल फिरून नदीत ओढत असतात. एक रानगुर रीचवलं की दुसरं, त्यानंतर, तिसरं... त्यांची भुक काही शमत नसते. मारानदीचं मातकट गढुळ पाणी रानगुरांच्या रक्तानी पार लाल होऊन जातं तरीही! मगरींपासून वाचलेली काही अभागी गुरं भोव-यांत अडकून मारानदीच्या पोटात गुडुप होतात. त्यातून पैलतिरी पोचलेल्या काहींचा सिहं, तरसांचे कळप फडशा पाडतात आणि काही लहान, वृद्ध रानगुरं तर निव्वळ चेंगराचेंगरीतच; एकमेकांच्या पायाखाली येऊन हाकनाक बळी जातात. कित्येक तासांनी हा मृत्यूचा ताडंव जेव्हा शांत होतो तेव्हा लाखोंच्या रानगुरांच्या झुंडीतले काही हजार जीव नक्कीच कामी आलेले असतात.

Pic Credit: https://images.app.goo.gl/JjVq2prtbrjx4NS98

तो कुमार नील-रानगुर सुद्धा मगरीच्या कराल जबड्यात अडकणार तेवढ्यात मागून येणा-या लोंढ्याचा त्याला धक्का लागतो, तो बाजूला ढकलला जातो आणि त्याच्या ऐवजी त्याच्या डोळ्यांदेखत त्याच्या बहीणीचा मगरीच्या तोडांत घास पडतो. पराकाष्ठेनी जेव्हा तो पैलतीरावरील पठारावर पोचतो तेव्हा त्याची आई, कुटुंब, मित्र कुठे आहेत, किंवा आहेत की नाहीत ह्याचा ही त्याला थांग पत्ता नसतो. तिथे हजारो लाखो आया हंबरून हंबरून आपापल्या बछड्यांना शोधत असतात. कुमार नील-रानगुरसुद्धा जिवाच्या आकांताने रेकून रेकून आईला शोधत असतो कारण त्याला माहीत असतं, मारानदीतून वाचलो; पण आई नाही तर ह्या मोकळ्या कुरणांवर सिंह बिबट्यांचे भक्ष होण्यापासून कोणीही आपल्याला वाचवणार नाही. बाकीचे मित्र, भावंड जरी मेले असले तरी देवाच्या दयेने त्याला दुस-या दिवशी संध्याकाळी त्याची आई सापडते.

Pic Credit: https://www.behance.net/gallery/51899903/go2Africa-The-Great-Wildebeest-Migration

 

----आत्ता----

आईच्या देखरेखीत मसाईमारा, सेरेंगेटी जंगलात गोलफिरत पुन्हा मारानदी किनारी पोचेपर्यंत त्या कुमार नील-रानगुराचा मुक्त स्वावलंबी तरूण झालेला असतो.

मागच्या वर्षीचा अनुभव गाठिशी घेऊन तो ठरवतो की ‘बास झालं हे फिरणं. सगळ्यांच्या मागे जाऊन ती नदी ओलांडताना असं कीडामुंग्यांसारखं मरण्यात काही राम नाही. सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायलाच पाहीजे. आपण इथेच थांबू. कोणीच न चोखाळलेली वाट धरूनच; हे स्थलांतर म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे हे दाखवून देता येईल आणि नाहीच काही जमलं तरी बाकी रानगुरांसारखा त्या गोंधळात आपला जीव तर जाणार नाही!’.

त्याचे हे विचार जेव्हा त्याच्या आईला समजतात तेव्हा ती त्याला खूप समजावयाचा प्रयत्न करते की, “बाळा अरे उन्हाळ्यात गवताचं एक पातं उरत नाही इथे असं ऐकलय. पाण्याचे सगळे स्त्रोत सुद्धा अटुन जात असतील. त्याशिवाय का एवढे सगळे आपले भाऊबंद मारापार जातात?”

त्यावर तो आईला म्हणतो, “अगं आई, एकदा सगळे इथून गेल्यावर अत्ताचं गवत मला खूप दिवस पुरेल. आणि पाण्याचं म्हणशील तर आपण, झेब्रे आणि काही हरणांच्या प्रजाती सोडल्या तर इतर प्राणी असतात ना इथेच. त्यांना जसं मिळतं तसं मलाही मिळेल पाणी.”

“अरे बाळा पण आम्ही सगळे इथून गेल्यावर शिकारीप्राण्यां पासून कसा काय वाचणार? झुंडीत राहण्याचा हाच तर मोठा फायदा असतो ना. तोच नसेल तर तु काय करणार, कसा राहाणार?”. आई म्हणाली.

“माझ्या सामर्थ्यावर माझा पुर्ण विश्वास आहे. मी संभाळून घेईन. तु काळजी करू नकोस. त्या स्थलांतराच्या रामरगाड्यात मलानाही अडकायचं”

आई त्याला खूप प्रकारे समजावायचा, त्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न करते. पण अखेरीस तीचा नाईलाज होतो. तो नील-रानगुर काही आता लहान राहीला नव्हता. त्याला त्याच्या दैवाच्या हवाली करून इतर रानगुरांबरोबर त्याची आई निघून जाते आणि इकडे ह्याची खरी परीक्षा सुरु होते.

Pic Credit: https://images.app.goo.gl/ERWgyUMZ8rXCbPhg9

सुरवातीचे काही दिवस त्याला इतर सर्व रानगुरं निघून गेल्यामुळे मुबलक चारा मिळतो. मैलोंमैल पसरलेल्या कुरणांचा तोच अनभिषिक्त सम्राट आहे असं त्याला वाटायला लागतं. त्याच्या बरोबर मागे राहिलेले वयोवृद्ध, अपंगं, अशक्त रानगुरं आणि आई-बाबांनी टाकलेली लहान पिल्लं ह्यांची सहज शिकार मिळत असल्याने मांसाहारी प्राणीही त्या धष्टपुष्ट नील-रानगुराच्या वाट्याला जात नाहीत.

पण हळू हळू दिवस पालटायला लागतात. आधिच विरळ झालेलं गवत उन्हात रापून पिवळं व्हायला लागतं. त्यातून हवं तितकं पोषण मिळेनासं होतं. मारानदीही आटत चालली असते. पाण्यासाठी दूर दूर फिरत बसावं लागतं. त्याला त्याच्या आईची, बाकी झुंडीची पुन्हा पुन्हा आठवण येऊ लागते. आधि सिंहांनी किंवा तरसांनी हल्ला केला की वेगानं पळून धूम ठोकणा-या नील-रानगुरांत आता पुर्वी इतकी शक्तीही उरलेली नसते. मांसाहारी प्राण्यांनी अशक्त प्राण्यांच्या शिकारी करून केव्हाच फडशा पाडलेला असतो आणि आता ह्या नील-रानगुराचीच जणु पाळी असते. अशा परिस्थितीत काय करायचं ह्याचं उत्तर मात्र त्याच्याकडे नसतं. 

आणि शेवटी व्हायचं तेच होतं. एका बेसावध क्षणी, तहानभुकेने व्याकूळ होऊन एका वाळलेल्या झाडाच्या सावलीत विसावलेल्या त्या नील-रानगुरावर सिंहींणींचा एका कळप हल्ला करतो. पळून जाण्याइतकाही वेळ त्याला मिळत नाही. स्वतःवरच्या फाजील आत्मविश्वासानी त्याचा घात होतो.


Pic Credit: https://images.app.goo.gl/tYGpyUxXkssidhLn9



मसाईमारा आणि सेरेंगेटीच्या जंगलाला फेरा मारून इतर रानगुरांबरोबर जेव्हा त्या नील-रानगुराची आई परत त्या कुरणांवर येते तेव्हा तिथे विखुरलेल्या अनेक सापळ्यांपैकी एका सापळ्याला आपला लेक समजून ढसाढसा रडत म्हणते, "बाळा इथे थांबून कसं वाचायचं ह्याची कुठलीही योजना न आखता, त्यासाठी स्वतःला तयार न करता, केवळ सगळ्यांपेक्षा वेगळं करण्याच्या वेडाने तुझा बळी घेतला! स्वतःला जोखून, स्वतःची कुवत ओळखून तू आमच्या बरोबर प्रवासाला निघाला असतास तर तुझा जीव वाचण्याची अधिक शक्याता होती ना रे बाळा. पण हे तुला कधी कळलच नाही". पण आता ह्या सगळ्याचा काय उपयोग?


तात्पर्यः १. कुठल्याही ठोस योजनेशिवाय प्रवाहाविरुद्ध जाणे आत्मघातकी ठरते.

       २. स्वतःवरचा आंधळा विश्वास आपल्या –हासास कारणीभूत ठरतो.

       ३. आपल्यापेक्षा अधिक अनुभव असलेल्यांचे म्हणणे पुर्ण विचारांतीच धुडकावून लावावे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Saturday, May 16, 2020

"घे भरारी" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ६



"घे भरारी" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ६


काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भारतात त्या काळी 'ए - वन ' सर्कस खूप प्रसिद्द होती. त्या काळी सर्कसीत हत्ती, घोडे, वाघ, सिंह असे सगळे प्राणी आणि विविध पक्षी असायचे. या सगळ्या प्राणी आणि पक्षांची देखभाल सर्कशीचे मालक जातीनं करत. कुठल्याही प्राण्यांवर जोर जबरदस्ती ना करता त्यांच्या कला कलानं घेत कसरती करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता.

Pic Credit: https://freedesignfile.com/567891-circus-background-cartoon-styles-vector-02/


ए वन सर्कसचं वाघ सिंहां खेरीज एक खास आकर्षण होतं काकाकुवा पक्षांनी केलेल्या कसरती. छोट्य छोट्या दांड्यांवरून, पाळण्यांवरून, छोट्या गाड्यांवरून एका मोठ्या मंचावर गिरक्या घेत, फे-या मारत, उलटे सुलटे होत, वेगवेगळे आवाज काढत, झोके घेत कसरती दाखवणारे पांढ-या, गुलाबी, राखाडी, पिवळ्या, काळ्या रंगाचे काकाकुवा सर्कसीत बहार आणायचे.

Pic Credit: https://images.app.goo.gl/f7uXcoh2xJDhf2B88

पण एक काकाकुवा मात्र ह्यात हीरीरीने भाग घेत नसे. ह्या कसरती करताना तो खूप उदास असे. सर्कस संपली की मात्र तो पिंज-यात उंच उंच भरा-या मारत असे. त्यात त्याला मनापासून आनंद वाटे. इतर काकाकुवांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की, "अरे, आपले मालक खूप चांगले आहेत. आपली खूप काळजी घेतात. तेव्हा आपलंही काम आहे की आपण कसरती मनापासून कराव्यात".

त्यावर तो म्हणे, "आपले मालक चांगले आहेत ह्यात कुठलीच शंका नाही. पण कसरती करण्यात मला मजाच येत नाही. माझा आनंद उंच उडण्यात, भरारी मारण्यात आहे. तुम्ही सगळे कसरती करताय म्हणून मला जे मनापासून आवडतं ते मी सोडून देऊ हे काही मला पटत नाही."

Pic Credit: https://images.app.goo.gl/PQMbEaMNuDq97FPw8

त्यावर बाकी काकाकुवा त्याला सांगत, "उगाच प्रवाह विरुद्ध धावण्याच्या गप्पा मारू नकोस. सर्कसीतच आपला जन्म झाला, आपण सर्कसीतच वाढलो. ही सर्कस हेच आपलं जीवन आणि कसरती हेच आपलं जगणं". मग तो म्हणे, "मी कुठे सर्कस सोडून जाण्याचा विचार करतोय? मी फक्त माझ्याशी प्रामाणीक राहाण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सगळे करताय; म्हणून मला ज्या गोष्टीची मना पासून ओढ लागलीय आणि त्यासाठी कितीही कष्ट करण्याची माझी तयारी आहे ती मी सोडून देउ?".

सर्कसीचे मालक काकाकुवांचं हे बोलणं ऐकत होते आणि त्यांनी सर्वांना थक्क करणारा एक निर्णय घेतला. त्यांनी त्या ध्येयवेड्या पक्षाला पिंज-यातून बाहेर काढलं आणि मुक्त केलं. त्याला तो म्हणाला, "जा उड. जितकं उंच उडायचं  तितकं उड, त्यासाठि सर्कसीतून बाहेर पडावं लागलं तरी माझी त्याला ना नाही. मी तुझ्या बरोबर आहे". मालकांच्या ह्या उदारपणामुळे त्या काकाकुवाला खूप गलबलून आलं. तो त्यांना म्हणाला, "मनापासून धन्यावाद मालक. मला जे करायचय ते करायला मला सर्कस सोडण्याची बिलकुल गरज नाहीये. मी ईथेच राहून ते करेन. फक्त मला काही दिवस द्या".

Pic Credit: https://images.app.goo.gl/h9rvkL3dKNFngbFa9

झालं. इकडे सर्कसीचे खेळ त्या काकाकुवाशिवाय चालू होते आणि तिकडे हा काकाकुवा उंचचउंच भरा-या मारण्याचा सराव करू लागला. सततच्या अथक प्रयत्नांनी त्याला हळू हळू यश येऊ लागलं. त्याला जस जसं उंच उडता येऊ लागलं तस तसं त्यानी आपलं उदिष्ट अजून उंच केलं. तो आता हवेत कसरती करू लागला. ज्या गोष्टी बाकी काकाकुवा तंबुत मंचावर करत असत तो त्याच कसरती दोरी, दांडी, झोपाळा, गाडी ह्या कशाच्याही सहाय्याशिवाय हवेत करू लागला. गिरक्या घेणे, उलट सुलट होणे, झुपकन वर जाणे आणि सुरकन खाली येणे ह्यात तो तरबेज होऊ लागला.


Pic Credit: https://images.app.goo.gl/947vvagpPbwmo1rk6


ह्या सगळ्यावेळात बाकी काकाकुवांनी त्याच्याशी बोलणं टाकलं. तो पुर्ण एकटा पडला. पण त्यानी त्याचा धीर खचू दिला नाही. कारण त्याला हे नक्की ठाऊक होतं की एकदाका त्याला जे करायचय ते साध्य झालं की हेच सारे काकाकुवा त्याला डोक्यावर घेतील.

आणि अखेर तो म्हणत होता तसच झालं.  त्याचा सराईतपणा पाहून मालक कमालीचे खूष झाले. दुस-याच दिवसा पासून बाकी काकाकुवांच्या कसरती नंतर ह्या ध्येयवेड्या काकाकुवाच्या हवेतील कसरती सर्कसीत होऊ लागल्या आणि त्या लोकांनाही प्रचंड आवडू लागल्या. ह्या वेड्या काकाकुवाच्या कसरती पाहायला लोकांची अधिपेक्षा जास्त गर्दी होऊ लागली आणि मालकाला त्याचा प्रचंड फायदा होऊ लागला.

अर्थातच तो काकाकुवा सगळ्या सर्कसीच्या गळ्यातला ताईत बनला.

Pic Credit: https://images.app.goo.gl/X43TUsvhAk55CG9w7

तात्पर्यः १. इतरांपेक्षा वेगळं साध्य करायचं असेल आणि त्यासाठी वाटेल ती मेहनत करायची तयारी असेल तर  जगात काहीही अशक्य नाही.
           २. वेगळा मार्ग चोखाळत असताना आपल्याच लोकांचा विरोध होऊ शकतो तरी स्वतःवरचा विश्वास ढळू  द्यायचा नाही.

______________________________________________________________________________________________________





Wednesday, February 26, 2020

"नाही म्हणजे नाहीच!" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ५




"नाही म्हणजे नाहीच!" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ५


“व्हाऊऊऊऊSSS” “व्हाऊऊऊऊSSS”.... मध्यप्रदेशातलं पेंच जंगल, तिथल्या सगळ्यात मोठ्या जंगली कुत्र्यांच्या झुंडीच्या ह्या आवाजानी दणाणून सुटलं होतं. अर्थात त्याला कारणही तसंच होतं. ह्या भल्याथोरल्या झुंडीच्या सगळ्यात लहान कुत्र्यांच्या जोडप्याला पिल्लं झाली होती. आणि सगळी झुंड त्या आनंदात भुंकत संपुर्ण जंगलाला जणु तो आनंद सांगत होती.

Pic Credit: https://images.app.goo.gl/mxwyRtT1MBVucUjH8

ही जंगली कुत्री झुंडीनी मिळून मिसळून, सुत्र बद्ध पद्धतीनी सावज हेरून शिकार करण्यात फार प्रसिद्ध आहेत. जेव्हा झुंडीतली बाकी कुत्री शिकारीला जंगलात जातात तेव्हा त्यांच्या परंपरेनुसार आपली पहीलटकरीण कुत्री आपल्या पिलांची आणि त्याच बरोबर झुंडीतल्या इतर छोट्या कुत्र्यांची काळजी घ्यायला, त्यांच्यावर लक्ष ठेवायला, त्यांच्या बरोबर गुहेतच थांबे. दिवस मावळल्यावर जेव्हा बाकी झुंडीतली कुत्री शिकार करून परतत तेव्हा तोंडात भरून आणलेलेल शिकारीचे तुकडे ओकून सर्व पिल्लांना आणि नव्या आईला खाऊ घालत.

Pic Credit: https://images.app.goo.gl/sTcdRsapyttJzszE7
आपलं कुत्र्याचं जोडपं झुंडीत सगळ्यात लहान जरी असलं तरी एक उत्तम माता पिता होते. जसजशी ह्या लहान जोडप्याची पिल्लं मोठी होऊ लागली तसतशी त्यांची भूकही वाढू लागली आणि नव्या आईला आता आपणही आपल्या झुंडीबरोबर जाऊन शिकारीत त्यांना मदत करून आपल्या पिल्लांसाठी भरपूर शिकार घेऊन यावी असं वाटू लागलं. पण आपल्या, इतरांच्या एवढ्या पिल्लांना दिवसभर एकटं ठेउन शिकारीला जाणार कसं हा मोठा प्रश्ण होता.

एके दिवशी रात्री सर्व झुंड शिकारीवरून येऊन खाऊन पिऊन आपल्या गुहेत निवांत गप्पा मारत बसलेली असताना, ह्या नवीन जोडप्यानी झुंडीतल्या इतर मोठ्या कुत्र्यांपुढे हा विषय काढला. सगळ्या मोठ्या कुत्र्यांना तीचं म्हणणं पटत होतं, पण तिच्या ऐवजी पिल्लां बरोबर कोण थांबणार, हा प्रश्ण काही सुटत नव्हता. शेवटी म्हातारा होत असलेला कुत्रा त्यांना म्हणाला, “हे बघा, मी आता म्हातारा होत चाललोय, पुर्वी सारखी शिकारीची दगदग आता माझ्याच्यानी होत नाही. तेव्हा मी पिल्लांची देखभाल करत गुहेत थांबेन, तुम्ही बाकी सगळे निर्धास्त शिकारीला जा”. हे ऐकून सगळ्यांना फारच हायसं वाटलं आणि लगेच दुस-याच दिवशी पासून आपली नवीन आई शिकारीला जाऊ लागली. एवढ्या वयो वृद्ध, अनुभवी कुत्र्याच्या देखरेखीत आपली मुलं वाढणार ह्या कल्पनेनीच ती कुत्री भयंकर खुष झाली.

Pic Credit: https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTiK4jOddvxIkzYkQhIdmQB4vtU_vEWHHBQZfoMScH86p9sg1kX&s

ही कुत्री शिकारीला दिवसभर जायला लागल्या पासून काहीच दिवस झाले असतील. तिला तिच्या सगळ्यात लाडक्या गोड गोंडस पिल्ला मधे बदल जाणवू लागला. तो गप्प गप्प राहू लागला, त्यानी खाणं पिणं एकदम कमी केलं, सतत भेदरलेला तरी असे किंवा रागवलेला तरी असे. इतके दिवस बरोबर असलेली आई अचानक शिकारीला जाऊ लागल्यामुळे असं झालं असेल असं त्या नवीन जोडप्याला वाटलं. पण दिवसें दिवस ते गोड पिल्लू अधिकच एकलकोंडं, कावलेलं राहू लागलं आणि आता मात्र हे फार वेगळं प्रकरण आहे हे त्यांना जाणवलं. खोदून खोदून त्यांनी विचारल्यावर कुठे ते निरागस पिल्लू बोललं, “आंSS मलाना ते दिवसभर आमच्या बरोबर थांबणारे आजोबा नाही आवडत. ते ना मला एकट्यालाच गुहेपासून लांब घेऊन जातात आणि माझे लाड करतात. पण ते तुमच्या दोघांसारखे आवडणारे लाड नाही करत. घट्ट मिठित धरून ठेवतात, उगाचच कुठे कुठे पाप्या घेत बसतात, माझ्या सगळ्यां समोर न दाखवायच्या अंगाला घासून घासून हात लावतात... श्शीSSS मला नाही आवडत ते. आई, मला नाही थांबायचं त्यांच्या सोबत. तूच थांब ना गंSSS”.

Pic Credit: https://images.app.goo.gl/gopXHnoL6D3x4giw9

आपल्या लाडक्या पिल्ला कडून हे सगळं ऐकून त्यांना मोठा धक्काच बसला. क्षणभर काय करावं, काय नाही हे त्यांना कळेचना. आपण आपल्या पिल्लांना असं कोणी केलं तर मोठ्यांदा नाही म्हणायचं आणि आपल्याला येऊन सांगायचं हे का नाही सांगितलं? आपल्या ह्या एवढ्याश्या बाळानी काय काय भोगलं असेल याची त्यांना कल्पनाही करवेना. पण मग नंतर विचार आला की आपल्या बाळाला काही तरी गैरसमज झाला असेल. तो वृद्ध, अनुभवी कुत्रा असं नाही करणार. आपल्या झुंडीत उगाच का त्याल मानाचं स्थान आहे? तरी पण एक सुरक्षेचा उपाय म्हणून ते पिल्लाला सांगतात “बाळा तू घाबरू नकोस. आई बाबा तुझ्या बरोबर आहेत. उद्या परत असच झालं तर तू जोरात, नाही किंवा थांबा असं ओरड आणि लगेच आम्हाला सांग”. आई बाबांच्या ह्या बोलण्यानी पिल्लाला जरा धीर येतो आणि तो “हो” म्हणून खेळायला जातो.

दुस-या दिवशी तो वृद्ध कुत्रा पिल्लाच्या जवळ येतो तेव्हा ते पिल्लू काल आई बाबांनी सांगितल्या प्रमाणे “नाही” म्हणून जोरात ओरडतो. अचानक आलेल्या ह्या प्रतीसादामुळे तो वृद्ध कुत्रा एकदम गांगरून जातो. त्यातून बाकी पिल्लांचं ही तिकडे लक्ष जातं आणि तो मागे वळतो. हे सगळं पाहून त्या पिल्लाला हायसं वाटतं.

Pic Credit: https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn%3AANd9GcRnZVRhmyrQICQhJZjm4e2st5AsicI7MFK8XQ8n72T8NdBxk0zQ

असेच काही दिवस जातात तो वृद्ध कुत्रा त्या दिवसा पासून पिल्लाच्या जवळ येत नाही. आपल्या बाळाच्या वागण्यात एक नवा आत्मविश्वास आलेला पाहून त्याचे आईबाबापण निर्धास्त होतात.

पण एके दिवशी कुणाचं लक्ष नाही बघून तो वृद्ध कुत्रा पिल्लाला परत गुहे पासून लांब घेऊन जातो आणि धमकावतो, “परत जर मी जवळ आल्यावर मोठ्यांदा ओरडलास किंवा आपली गंमत इतर कोणाला सांगितलीस तर वाघाच्या गुहे समोर तुला नेऊन सोडून येईन. तो वाघ माझा चांगला मित्र आहे. तुला एका घासात तो फस्त करून टाकेल”. आता मात्र त्या निरागस पिल्लाला काय करावं ते कळेना. जिवाच्या भितीने तो निमूट वृद्ध कुत्र्याला सहन करू लागला.

आपल्या पिल्लामधे परत झालेला बदल त्या आई बाबांनी लगेच टिपला आणि काही तरी नक्की गडबड आहे हे त्यांना कळून चुकले. काय होतय ह्याची खात्री करण्यासाठी त्यांनी एक युक्ती ह्यावर योजली. दुस-या दिवशी नेहमी सारखे सगळ्यांबरोबर ते शिकारीला निघाले, पण आई शिकारीला जात नाही. गुहे जवळच्याच झुडपात ती लपून बसते. ह्या सगळ्या योजनेची माहीती नसल्याने तो वृद्ध कुत्रा पिल्लाला नेहमी प्रमाणे त्रास द्यायला लागताच ती झुडपानून बाहेर येते आणि त्या म्हाता-या कुत्र्यावर ह्ल्ला करून आपल्या पिल्लाला मिठित घेते. 

Pic Credit: https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTgxEz5mQkZ56IFnncBoqMq90Wyovhw8m-EQYejKOtnAmrr7TwH&s

संध्याकाळी शिकारी वरून परत आल्यावर तिने झालेला सगळा प्रकार झुंडीतल्या सगळ्यांना सांगितला. ह्याची गंभीर दखल झुंडीतल्या मोठ्या कुत्र्यांनी घेतली आणि त्या म्हाता-या कुत्र्याला झुंडीतून बाहेर काढलं. इतकच नव्हे त्याच्या ह्या वागण्याची तक्रार त्यांनी पेंच जंगलाच्या राजाकडे म्हणजे त्या वाघाकडेही ही केली की जेणे करून त्याला योग्य ती शिक्षा होऊन जंगलातल्या इतर कुठल्या पिल्लांना असा त्रास ह्याच्या मुळे किंवा इतर कोणा मुळे होऊ नये.

ह्या घटणे नंतर पिल्लू हळू हळू बरं होऊ लागलं. झालय ते पूसता तर कोणालाच येणार नाही, पण सगळ्यांच्या प्रेमामुळे ते पिल्लू आता आनंदी राहाण्याचा प्रयत्न करतय.

तात्पर्यः १. अन्यायाला प्रतीकार केलाच पाहीजे.
२. चूक कोणीही केलेली असो, त्या चुकीला योग्य ती शिक्षा झालीच पाहीजे.

_________________________________________________________________________________



Friday, January 24, 2020

"हे विश्वची माझे घर" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ४



हे विश्वची माझे घर



ही गोष्ट अजून काही वर्षांनंतरची – भविष्यकाळातील गोष्ट आहे.

गीरच्या जंगलात, सिंहांचं संवर्धन इतकं यशस्वी झालं की चौदाशे वर्ग किलोमिटरचं जंगल सिंहांना अपूरं पडू लागलं. सिंहांच्या टोळ्या एकमेकांच्या क्षेत्रांवर ताबा सांगू लागल्या. त्यातून टोळीयुद्धाला सुरुवात होऊ लागली. सिंहांची संख्या खूप वाढल्यामुळे पुरेश्या शिकारी मिळणं कठीण होऊ लागलं. एकुणातच गीरच्या जंगलात अनागोंदी माजायला लागली.

Pic Credit: https://images.app.goo.gl/GpdU9dxoekju2BaP7

यातून बाहेर पडलं नाही तर सततची टोळी युद्ध, अशांती, भुकमरी हे अटळ आहे हे गीरकेसरी कुटुंबाच्या तरुण सिंहाला कळलं होतं. गीरच्या दक्षिणेला, सह्याद्री पर्वताच्या जंगलां मधून बिबटे आणि तुरळक वाघ सोडले तर मार्जारवंशीय फारसे मोठे प्राणी नाहीत ही पक्की माहीती त्यानी काढली होती. कितीही, हवी हवीशी, प्रीय असली तरी आपल्या जन्म भूमीत आपला निभाव लागणार नाही, आपल्याला किंमत राहाणार नाही हे जर वाटत असेल तर आपले प्रीयजन सोडून नवी भूमी आपली कर्मभूमी करावी लागणार हे समजण्या इतका तो प्रगल्भ होता.

सगळ्या कुटुंबाचा निरोप घेउन तो निघाला. त्याला वाटलं तेवढं निरोप घेणं सोपं नव्हतं. त्याच्या बायकापोरांनी, मित्र-आप्तेष्टांनी त्याला जाण्या पासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. पण ह्या कुठल्याही मोहात न अडकता तो निघाला. संह्याद्रीच्या जंगलात मोठे मार्जार फारसे नाहीत कारण माणसाने ते शिल्लक ठेवले नाहीत अशी त्याला भितीही घालून झाली पण तरीही तो निघाला. इतकाच विचार करून की ‘मरण इकडेही आहे आणि कदाचीत तिकडेही. पण म्हणून कुठलेही प्रयत्न न करता हातावर हात धरून बसणं हा निव्वळ मुर्खपणा आहे. जेव्हा तिकडे आपलं बस्तान उत्तम बसेल, तेव्हाच सगळ्यांना आपलं म्हणणं पटेल’ हा त्याला सार्थ विश्वास होता.


Pic Credit: https://images.app.goo.gl/dNAs8gyP2C1mQxPw8

तो निघाला खरा, पण त्याच्या प्रत्येक पावलावर नवीन नवीन संकटं आ वासून उभी होती. एका जंगलातून दुस-या जंगलात जाणारे वन मार्ग माणसाने शिल्लक ठेवले नव्हते. त्यामुळे दिवसा ढवळ्या माणसाच्या नजरेस पडणार नाही असं गावाच्या बाहेर झाडीत, टेकडीवर लपून राहायचं आणि रात्रीच्या अंधारात, ओस पडलेल्या रस्त्यांवरून मार्गाक्रमण करत राहायचं. कित्येक दिवस असेही जायचे की शिकार ही मिळायची नाही तरी चालत राहाणं आणि गावं ओलांडणं भाग होतं. बरं, गावातले रस्ते सहसा रात्री ओस असत पण दोन गावांना जोडणा-या महामार्गांवर, वेगवान वाहानांची सततची वर्दळ. उभं आयुष्य जंगलात काढलेल्या त्या तरुण सिंहाला त्या वाहानांनी पार धडकी भरायची. त्या वाहानांचे डोळे दिपवणारे प्रखर दिवे, कर्णकर्कश्य भोंगे आणि भरीस भर म्हणून जीवघेणा वेग. दोन-तीन वेळा तर मोठ्या मोठ्या वाहानांना धडक होऊन मरता मरता तो वाचला. धडक झालीच, किंवा गाडी समोर आलीच तर जवळच्या झाडीत तो धूम ठोकत असे. कारण माणसांनी पाहीलं तर भितीच्या नावा खाली ते काय करतील याचा काही नेम नाही.

Pic Credit: https://images.app.goo.gl/avNuL4LFR1dqYErk8

पण सरते शेवटी मजल दरमजल करत तो सह्याद्रीच्या कुशीत पोचला. एक मोठा टप्पा पार पडला खरा पण संकटं काही संपायचं नाव घेत नव्हती. गीरच्या मुख्यत्वे सपाट जंगालां ऐवजी, सह्याद्रीची ऊंच सखल जमिन. ह्या पर्वतीय प्रदेशात शिकार दिसणं आणि मग ती करणं हे ये-यागबाळ्याचं काम नव्हतं. सपाट जंगलामधे शिकार करायला रुळलेलं शरीर डोंगरावर शिकार करायला साथ देत नव्हतं. कित्येक वेळा आपण येऊन चूक केली का असं त्याला वाटे. आपल्या परीवाराच्या, मित्रांच्या आठवणीने जीव अगदी काकूळतीला येई. इथे येण्याच्या निर्णयाचा पश्चाताप होई. सगळं सोडून परत आपल्या जंगलात, आपल्या कुटुंबाकडे परत जाण्याचा विचार येई. एकटेपणा, उपासमार, अवघड भूक्षेत्र सगळेच  त्याची परीक्षा पाहात होते.

Pic Credit: https://images.app.goo.gl/ecUwGvTySRQ5zB6w9

पण मग तो स्वताःला समजावे, 'आपल्या गीरच्या जंगलात होणा-या त्रासा पासून वाचायला इथे आलो ना. इथे शिकार करणं अवघड नक्की आहे, पण शिकारीयोग्य प्राणी भरपूर आहेत. जमीन वावरायला सोपी नाही पण दूर दूर पर्यंत गीरसारखी सिंहाची किंवा इतर मोठ्या मार्जारवंशीयांची गर्दीही नाही. एकुणात इथे बस्तान बसवणं अवघड आहे; पण एकदा का ते जमलं की आपणच ह्या जंगलाचे राजे होणार!'

आणि त्या दृष्टीने त्यानी प्रयत्न सुरु केले. आधी ते जंगल पालथं घातलं त्यानी, तिथे काय काय आहे, कसं, कुठे कोण प्राणी आहेत, त्यांच्या जमेच्या बाजू कुठल्या आणि कमकुवत बाजु कुठल्या, आपल्या कुठल्या, आपल्याला कशात काय बदल करावा लागेल, काय सुधारणा स्वतःत करावी लागेल. ह्या सगळ्यावर बारकाईने आभ्यास करून तो एक एक पाऊल टाकू लागला, वाढु लागला. हळू हळू, आपल्या ह्या सह्यकेसरीची जंगलात दहशत पसरू लागली आणि थोड्याच दिवसात तो त्या सह्याद्रीच्या जंगलाचा अनभिषिक्त सम्राट झाला.



त्यानंतर त्यानी त्याचं सबंध कुटुंब सह्याद्रीच्या त्या जंगलात आणलं. सुरुवातीला सगळ्यांना नविन जागेशी जुळवुन घेणं अवघड गेलं, पण कोणीच ताकदीचा प्रतीस्पर्धी नसलेल्या त्या जंगलात त्यांचं कुटुंब सुखानी राहू लागलं. त्यांना जरी ह्या त्रासातून जावं लागलं असलं तरी त्यांच्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित केल्याचं समाधान त्यांना झालं. गीरची आठवण होते त्यांना अधून मधून पण ह्या नविन जंगलाशीही त्यांचं घट्ट नातं तयार झालय! आणि पुढच्या पिढी साठी संह्याद्रीचं हे उंच सखल जंगलच त्यांचं मुळ घर झालय.

Pic Credit: https://images.app.goo.gl/hLjr5Yeuaa88V5yo8

सिंहांच्या ह्या धाडशी संक्रमणानी एक मात्र व्हावं, वेगवेगळी जंगलं जोडणारे वनमार्ग राखण्याचं मनुष्यप्राण्यानी मनावर घ्यावं!

तात्पर्यः १. चांगली किंवा वाईट परिस्थिती ही सद्य स्थितीत सुधारणा करण्याची एक संधीच असते.
२. स्वतःवर विश्वास ठेऊन प्रतीकुल प्रदेशात सुधारणा शक्य नसेल तर तिथुन बाहेर पडून नविन प्रदेश अनुकुल बनवता येऊ शकतो.
३. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कठिणातील कठिण परिस्थीतीवर मात करता येते.
४. कुटुंब, मित्र बरोबर नसतील तर मोठ्यातला मोठा विजयही अर्थहीन ठरतो.