"सरळ वाट वहीवाट धरावी" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी – ७
Pic Credit:https://images.app.goo.gl/dVoUxNpQBEc1DA7N8 |
आफ्रिकेतल्या टांझानिया देशातल्या सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यानाचा उत्तरेकडचा भाग. जुलैचा महीना होता. डोक्यावर सुर्य आग ओकत होता. दरवर्षी प्रमाणे सेरेंगेटीच्या मैलोंमैल लांब पसरलेल्या कुरणांवरचं गवत सुकुन चाललं होतं. पाण्याचे स्त्रोतही आटून कोरडे पडले होते. सेरेंगेटीच्या गवतावर पुष्ट झालेल्या लाखो झिब्रा, हरणं आणि विल्डबिस्टस् – रानगुरांना आता वेध लागले होते ते केनियाच्या मसाईमारा राष्ट्रीय उद्यानावर येणा-या पावसाचे आणि पावसामुळे उगवणा-या कोवळ्या लुससुशित गवताचे. केनिया आणि टांझानिया या दोन देशांमधे पसरलेल्या विस्तृत जंगलांमधून पावसाचा वेध घेत घड्याळ्याच्या दिशेत कोवळा चारा शोधत हे तृणभक्षी फिरत असतात. पण जुलै – ऑगस्ट महीन्यात टांझानियातून मारानदी ओलांडून केनियात होणारं त्यांचं महास्थलांतर हे विषेश करून रोमहर्षक आणि जोखमीचं असतं.
Pic Credit: Link Lost |
आपल्या
आईच्या देखरेखीतून अत्ताच सुटलेल्या तरुण नील-रानगुराच्या मनात मगच्यावर्षीच्या
महास्थलांतरानी दिलेल्या जखमामात्र अजूनही तशाच ताज्या असतात.
----एक वर्षापुर्वी----
जुलैमहीन्यातली मध्यान. सुर्यकिरण सेरेंगेटीचं सगळं मैदान भाजून काढत होते. मारानदीच्या
किनारी एका अगदी कमी ऊंचीच्या पठारावर लाखोंच्या संख्येनी रानगुरांचे तांडे थांबले
होते. ऐलतीरी उन्हाचा राप; ही नदी ओलांडायची आणि पैलतीरी पावसाचा प्रदेश. पण एवढी गुरं
एकत्र असूनही सगळीकडे नीश्चलता. नीरव शांतता. हवेत जाणणवणारा एक विचित्र ताण. धास्ती,
भिती. कारण इथून पुढे प्रत्येक पावलावर साक्षात मृत्यु आ-वासून थांबलेला. नदीत रानगुरांच्या
मेजवानी साठी पाण्यात लपून बसलेल्या अगणित मगरी, पलीकडे मोक्याच्या ठिकाणी दबा धरून
बसलेले अनेक सिंह, बिबटे आणि तरस आणि झालच तर मारानदीचा जीवघेणा आवेग, पाण्यातले भोवरे.
उतरायचं तरी कसं, कुठुन आणि कोणी?
Pic Credit: https://www.behance.net/gallery/51899903/go2Africa-The-Great-Wildebeest-Migration |
कितीतरी
वेळ असाच जातो. कोणीच नदीत उतरायला तयार नसतं. रानगुरांच्या त्या जथ्थ्यात मधोमध कुठेतरी
उभं राहून आपल्या आई आणि भावंडां सोबत एक कुमार नील-रानगुर ही तगमग अनुभवत असतो. हे
सगळं काय चाललय हे कळायच्या आत, एक रानगुर मारानदीत स्वतःला झोकून देतं आणि बघता बघता
रानगुरांच्या झुंडीच्या झुंडी पाण्यात उड्या टाकतात. मागे थांबलेल्या गुरांचा रेटा
एवढा जबरदस्त असतो की ते नील-रानगुरांचं कुटुंब आपोआप पुढे ढकललं जातं. आता वेग आणि
नशिबच काय ते तारून नेणार होतं.
त्यांच्यापैकी कित्येक रानगुरं अगदी सहज आधाशी मगरींच्या भक्षस्थानी पडतात, किडे मुंग्या मरावेत तसे हे कित्येक किलोंचे रानगुर मगरी जबड्यात पकडून, पाण्यात चाकासारखं गोल गोल फिरून नदीत ओढत असतात. एक रानगुर रीचवलं की दुसरं, त्यानंतर, तिसरं... त्यांची भुक काही शमत नसते. मारानदीचं मातकट गढुळ पाणी रानगुरांच्या रक्तानी पार लाल होऊन जातं तरीही! मगरींपासून वाचलेली काही अभागी गुरं भोव-यांत अडकून मारानदीच्या पोटात गुडुप होतात. त्यातून पैलतिरी पोचलेल्या काहींचा सिहं, तरसांचे कळप फडशा पाडतात आणि काही लहान, वृद्ध रानगुरं तर निव्वळ चेंगराचेंगरीतच; एकमेकांच्या पायाखाली येऊन हाकनाक बळी जातात. कित्येक तासांनी हा मृत्यूचा ताडंव जेव्हा शांत होतो तेव्हा लाखोंच्या रानगुरांच्या झुंडीतले काही हजार जीव नक्कीच कामी आलेले असतात.
Pic Credit: https://images.app.goo.gl/JjVq2prtbrjx4NS98 |
तो
कुमार नील-रानगुर सुद्धा मगरीच्या कराल जबड्यात अडकणार तेवढ्यात मागून येणा-या लोंढ्याचा
त्याला धक्का लागतो, तो बाजूला ढकलला जातो आणि त्याच्या ऐवजी त्याच्या डोळ्यांदेखत
त्याच्या बहीणीचा मगरीच्या तोडांत घास पडतो. पराकाष्ठेनी जेव्हा तो पैलतीरावरील पठारावर
पोचतो तेव्हा त्याची आई, कुटुंब, मित्र कुठे आहेत, किंवा आहेत की नाहीत ह्याचा ही त्याला
थांग पत्ता नसतो. तिथे हजारो लाखो आया हंबरून हंबरून आपापल्या बछड्यांना शोधत असतात.
कुमार नील-रानगुरसुद्धा जिवाच्या आकांताने रेकून रेकून आईला शोधत असतो कारण त्याला
माहीत असतं, मारानदीतून वाचलो; पण आई नाही तर ह्या मोकळ्या कुरणांवर सिंह बिबट्यांचे
भक्ष होण्यापासून कोणीही आपल्याला वाचवणार नाही.
Pic Credit: https://www.behance.net/gallery/51899903/go2Africa-The-Great-Wildebeest-Migration |
----आत्ता----
आईच्या देखरेखीत मसाईमारा, सेरेंगेटी जंगलात गोलफिरत पुन्हा मारानदी किनारी पोचेपर्यंत त्या कुमार नील-रानगुराचा मुक्त स्वावलंबी तरूण झालेला असतो.
मागच्या
वर्षीचा अनुभव गाठिशी घेऊन तो ठरवतो की ‘बास झालं हे फिरणं. सगळ्यांच्या मागे जाऊन
ती नदी ओलांडताना असं कीडामुंग्यांसारखं मरण्यात काही राम नाही. सगळ्यांपेक्षा काहीतरी
वेगळं करायलाच पाहीजे. आपण इथेच थांबू. कोणीच न चोखाळलेली वाट धरूनच; हे स्थलांतर म्हणजे
निव्वळ वेडेपणा आहे हे दाखवून देता येईल आणि नाहीच काही जमलं तरी बाकी रानगुरांसारखा
त्या गोंधळात आपला जीव तर जाणार नाही!’.
त्याचे
हे विचार जेव्हा त्याच्या आईला समजतात तेव्हा ती त्याला खूप समजावयाचा प्रयत्न करते
की, “बाळा अरे उन्हाळ्यात गवताचं एक पातं उरत नाही इथे असं ऐकलय. पाण्याचे सगळे स्त्रोत
सुद्धा अटुन जात असतील. त्याशिवाय का एवढे सगळे आपले भाऊबंद मारापार जातात?”
त्यावर
तो आईला म्हणतो, “अगं आई, एकदा सगळे इथून गेल्यावर अत्ताचं गवत मला खूप दिवस पुरेल.
आणि पाण्याचं म्हणशील तर आपण, झेब्रे आणि काही हरणांच्या प्रजाती सोडल्या तर इतर प्राणी
असतात ना इथेच. त्यांना जसं मिळतं तसं मलाही मिळेल पाणी.”
“अरे
बाळा पण आम्ही सगळे इथून गेल्यावर शिकारीप्राण्यां पासून कसा काय वाचणार? झुंडीत राहण्याचा
हाच तर मोठा फायदा असतो ना. तोच नसेल तर तु काय करणार, कसा राहाणार?”. आई म्हणाली.
“माझ्या
सामर्थ्यावर माझा पुर्ण विश्वास आहे. मी संभाळून घेईन. तु काळजी करू नकोस. त्या स्थलांतराच्या रामरगाड्यात
मलानाही अडकायचं”
आई त्याला खूप प्रकारे समजावायचा, त्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न करते. पण अखेरीस तीचा नाईलाज होतो. तो नील-रानगुर काही आता लहान राहीला नव्हता. त्याला त्याच्या दैवाच्या हवाली करून
इतर रानगुरांबरोबर त्याची आई निघून जाते आणि इकडे ह्याची खरी परीक्षा सुरु होते.
Pic Credit: https://images.app.goo.gl/ERWgyUMZ8rXCbPhg9 |
सुरवातीचे
काही दिवस त्याला इतर सर्व रानगुरं निघून गेल्यामुळे मुबलक चारा मिळतो. मैलोंमैल पसरलेल्या
कुरणांचा तोच अनभिषिक्त सम्राट आहे असं त्याला वाटायला लागतं. त्याच्या बरोबर मागे
राहिलेले वयोवृद्ध, अपंगं, अशक्त रानगुरं आणि आई-बाबांनी टाकलेली लहान पिल्लं ह्यांची
सहज शिकार मिळत असल्याने मांसाहारी प्राणीही त्या धष्टपुष्ट नील-रानगुराच्या वाट्याला जात नाहीत.
पण हळू हळू दिवस पालटायला लागतात. आधिच विरळ झालेलं गवत उन्हात रापून पिवळं व्हायला लागतं. त्यातून हवं तितकं पोषण मिळेनासं होतं. मारानदीही आटत चालली असते. पाण्यासाठी दूर दूर फिरत बसावं लागतं. त्याला त्याच्या आईची, बाकी झुंडीची पुन्हा पुन्हा आठवण येऊ लागते. आधि सिंहांनी किंवा तरसांनी हल्ला केला की वेगानं पळून धूम ठोकणा-या नील-रानगुरांत आता पुर्वी इतकी शक्तीही उरलेली नसते. मांसाहारी प्राण्यांनी अशक्त प्राण्यांच्या शिकारी करून केव्हाच फडशा पाडलेला असतो आणि आता ह्या नील-रानगुराचीच जणु पाळी असते. अशा परिस्थितीत काय करायचं ह्याचं उत्तर मात्र त्याच्याकडे नसतं.
आणि शेवटी व्हायचं तेच होतं. एका बेसावध क्षणी, तहानभुकेने व्याकूळ होऊन एका
वाळलेल्या झाडाच्या सावलीत विसावलेल्या त्या नील-रानगुरावर सिंहींणींचा एका कळप हल्ला करतो. पळून जाण्याइतकाही वेळ त्याला मिळत नाही. स्वतःवरच्या फाजील आत्मविश्वासानी
त्याचा घात होतो.
Pic Credit: https://images.app.goo.gl/tYGpyUxXkssidhLn9 |
मसाईमारा आणि सेरेंगेटीच्या जंगलाला फेरा मारून इतर रानगुरांबरोबर जेव्हा त्या नील-रानगुराची आई परत त्या कुरणांवर येते तेव्हा तिथे विखुरलेल्या अनेक सापळ्यांपैकी एका सापळ्याला आपला लेक समजून ढसाढसा रडत म्हणते, "बाळा इथे थांबून कसं वाचायचं ह्याची कुठलीही योजना न आखता, त्यासाठी स्वतःला तयार न करता, केवळ सगळ्यांपेक्षा वेगळं करण्याच्या वेडाने तुझा बळी घेतला! स्वतःला जोखून, स्वतःची कुवत ओळखून तू आमच्या बरोबर प्रवासाला निघाला असतास तर तुझा जीव वाचण्याची अधिक शक्याता होती ना रे बाळा. पण हे तुला कधी कळलच नाही". पण आता ह्या सगळ्याचा काय उपयोग?
तात्पर्यः
१. कुठल्याही ठोस योजनेशिवाय प्रवाहाविरुद्ध जाणे आत्मघातकी ठरते.
२. स्वतःवरचा आंधळा विश्वास आपल्या –हासास
कारणीभूत ठरतो.
No comments:
Post a Comment