Friday, January 24, 2020

"हे विश्वची माझे घर" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ४



हे विश्वची माझे घर



ही गोष्ट अजून काही वर्षांनंतरची – भविष्यकाळातील गोष्ट आहे.

गीरच्या जंगलात, सिंहांचं संवर्धन इतकं यशस्वी झालं की चौदाशे वर्ग किलोमिटरचं जंगल सिंहांना अपूरं पडू लागलं. सिंहांच्या टोळ्या एकमेकांच्या क्षेत्रांवर ताबा सांगू लागल्या. त्यातून टोळीयुद्धाला सुरुवात होऊ लागली. सिंहांची संख्या खूप वाढल्यामुळे पुरेश्या शिकारी मिळणं कठीण होऊ लागलं. एकुणातच गीरच्या जंगलात अनागोंदी माजायला लागली.

Pic Credit: https://images.app.goo.gl/GpdU9dxoekju2BaP7

यातून बाहेर पडलं नाही तर सततची टोळी युद्ध, अशांती, भुकमरी हे अटळ आहे हे गीरकेसरी कुटुंबाच्या तरुण सिंहाला कळलं होतं. गीरच्या दक्षिणेला, सह्याद्री पर्वताच्या जंगलां मधून बिबटे आणि तुरळक वाघ सोडले तर मार्जारवंशीय फारसे मोठे प्राणी नाहीत ही पक्की माहीती त्यानी काढली होती. कितीही, हवी हवीशी, प्रीय असली तरी आपल्या जन्म भूमीत आपला निभाव लागणार नाही, आपल्याला किंमत राहाणार नाही हे जर वाटत असेल तर आपले प्रीयजन सोडून नवी भूमी आपली कर्मभूमी करावी लागणार हे समजण्या इतका तो प्रगल्भ होता.

सगळ्या कुटुंबाचा निरोप घेउन तो निघाला. त्याला वाटलं तेवढं निरोप घेणं सोपं नव्हतं. त्याच्या बायकापोरांनी, मित्र-आप्तेष्टांनी त्याला जाण्या पासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. पण ह्या कुठल्याही मोहात न अडकता तो निघाला. संह्याद्रीच्या जंगलात मोठे मार्जार फारसे नाहीत कारण माणसाने ते शिल्लक ठेवले नाहीत अशी त्याला भितीही घालून झाली पण तरीही तो निघाला. इतकाच विचार करून की ‘मरण इकडेही आहे आणि कदाचीत तिकडेही. पण म्हणून कुठलेही प्रयत्न न करता हातावर हात धरून बसणं हा निव्वळ मुर्खपणा आहे. जेव्हा तिकडे आपलं बस्तान उत्तम बसेल, तेव्हाच सगळ्यांना आपलं म्हणणं पटेल’ हा त्याला सार्थ विश्वास होता.


Pic Credit: https://images.app.goo.gl/dNAs8gyP2C1mQxPw8

तो निघाला खरा, पण त्याच्या प्रत्येक पावलावर नवीन नवीन संकटं आ वासून उभी होती. एका जंगलातून दुस-या जंगलात जाणारे वन मार्ग माणसाने शिल्लक ठेवले नव्हते. त्यामुळे दिवसा ढवळ्या माणसाच्या नजरेस पडणार नाही असं गावाच्या बाहेर झाडीत, टेकडीवर लपून राहायचं आणि रात्रीच्या अंधारात, ओस पडलेल्या रस्त्यांवरून मार्गाक्रमण करत राहायचं. कित्येक दिवस असेही जायचे की शिकार ही मिळायची नाही तरी चालत राहाणं आणि गावं ओलांडणं भाग होतं. बरं, गावातले रस्ते सहसा रात्री ओस असत पण दोन गावांना जोडणा-या महामार्गांवर, वेगवान वाहानांची सततची वर्दळ. उभं आयुष्य जंगलात काढलेल्या त्या तरुण सिंहाला त्या वाहानांनी पार धडकी भरायची. त्या वाहानांचे डोळे दिपवणारे प्रखर दिवे, कर्णकर्कश्य भोंगे आणि भरीस भर म्हणून जीवघेणा वेग. दोन-तीन वेळा तर मोठ्या मोठ्या वाहानांना धडक होऊन मरता मरता तो वाचला. धडक झालीच, किंवा गाडी समोर आलीच तर जवळच्या झाडीत तो धूम ठोकत असे. कारण माणसांनी पाहीलं तर भितीच्या नावा खाली ते काय करतील याचा काही नेम नाही.

Pic Credit: https://images.app.goo.gl/avNuL4LFR1dqYErk8

पण सरते शेवटी मजल दरमजल करत तो सह्याद्रीच्या कुशीत पोचला. एक मोठा टप्पा पार पडला खरा पण संकटं काही संपायचं नाव घेत नव्हती. गीरच्या मुख्यत्वे सपाट जंगालां ऐवजी, सह्याद्रीची ऊंच सखल जमिन. ह्या पर्वतीय प्रदेशात शिकार दिसणं आणि मग ती करणं हे ये-यागबाळ्याचं काम नव्हतं. सपाट जंगलामधे शिकार करायला रुळलेलं शरीर डोंगरावर शिकार करायला साथ देत नव्हतं. कित्येक वेळा आपण येऊन चूक केली का असं त्याला वाटे. आपल्या परीवाराच्या, मित्रांच्या आठवणीने जीव अगदी काकूळतीला येई. इथे येण्याच्या निर्णयाचा पश्चाताप होई. सगळं सोडून परत आपल्या जंगलात, आपल्या कुटुंबाकडे परत जाण्याचा विचार येई. एकटेपणा, उपासमार, अवघड भूक्षेत्र सगळेच  त्याची परीक्षा पाहात होते.

Pic Credit: https://images.app.goo.gl/ecUwGvTySRQ5zB6w9

पण मग तो स्वताःला समजावे, 'आपल्या गीरच्या जंगलात होणा-या त्रासा पासून वाचायला इथे आलो ना. इथे शिकार करणं अवघड नक्की आहे, पण शिकारीयोग्य प्राणी भरपूर आहेत. जमीन वावरायला सोपी नाही पण दूर दूर पर्यंत गीरसारखी सिंहाची किंवा इतर मोठ्या मार्जारवंशीयांची गर्दीही नाही. एकुणात इथे बस्तान बसवणं अवघड आहे; पण एकदा का ते जमलं की आपणच ह्या जंगलाचे राजे होणार!'

आणि त्या दृष्टीने त्यानी प्रयत्न सुरु केले. आधी ते जंगल पालथं घातलं त्यानी, तिथे काय काय आहे, कसं, कुठे कोण प्राणी आहेत, त्यांच्या जमेच्या बाजू कुठल्या आणि कमकुवत बाजु कुठल्या, आपल्या कुठल्या, आपल्याला कशात काय बदल करावा लागेल, काय सुधारणा स्वतःत करावी लागेल. ह्या सगळ्यावर बारकाईने आभ्यास करून तो एक एक पाऊल टाकू लागला, वाढु लागला. हळू हळू, आपल्या ह्या सह्यकेसरीची जंगलात दहशत पसरू लागली आणि थोड्याच दिवसात तो त्या सह्याद्रीच्या जंगलाचा अनभिषिक्त सम्राट झाला.



त्यानंतर त्यानी त्याचं सबंध कुटुंब सह्याद्रीच्या त्या जंगलात आणलं. सुरुवातीला सगळ्यांना नविन जागेशी जुळवुन घेणं अवघड गेलं, पण कोणीच ताकदीचा प्रतीस्पर्धी नसलेल्या त्या जंगलात त्यांचं कुटुंब सुखानी राहू लागलं. त्यांना जरी ह्या त्रासातून जावं लागलं असलं तरी त्यांच्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित केल्याचं समाधान त्यांना झालं. गीरची आठवण होते त्यांना अधून मधून पण ह्या नविन जंगलाशीही त्यांचं घट्ट नातं तयार झालय! आणि पुढच्या पिढी साठी संह्याद्रीचं हे उंच सखल जंगलच त्यांचं मुळ घर झालय.

Pic Credit: https://images.app.goo.gl/hLjr5Yeuaa88V5yo8

सिंहांच्या ह्या धाडशी संक्रमणानी एक मात्र व्हावं, वेगवेगळी जंगलं जोडणारे वनमार्ग राखण्याचं मनुष्यप्राण्यानी मनावर घ्यावं!

तात्पर्यः १. चांगली किंवा वाईट परिस्थिती ही सद्य स्थितीत सुधारणा करण्याची एक संधीच असते.
२. स्वतःवर विश्वास ठेऊन प्रतीकुल प्रदेशात सुधारणा शक्य नसेल तर तिथुन बाहेर पडून नविन प्रदेश अनुकुल बनवता येऊ शकतो.
३. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कठिणातील कठिण परिस्थीतीवर मात करता येते.
४. कुटुंब, मित्र बरोबर नसतील तर मोठ्यातला मोठा विजयही अर्थहीन ठरतो.

No comments:

Post a Comment