Thursday, January 16, 2020

"तू साद दे" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ३

डिस्कव्हरी वाहीनीवर प्रसारीत झालेल्या माहीतीपटावर आधारीत.



तू साद दे


Pic Credit: https://images.app.goo.gl/R3GoZQa7RgXa4tMfA

गुजराथच्या गीर अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रातली ही गोष्ट. आशियायी सिंहांचं हे एकमेव वस्ती स्थान. अभयारण्याच्या मुख्यक्षेत्राला वेढून असलेलं जंगल आणि तुरळक मनुष्यवस्तीचं बेमालूम मिश्रण म्हणजे हे संरक्षित क्षेत्र.

Pic Credit: http://www.conservingcentralindia.org/uploads/1/8/1/8/18187127/published/handbook-1.jpg?1522696260

अभयारण्याच्या मुख्यक्षेत्रात तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढली की अन्नाच्या शोधात तिथले प्राणी बाहेर येऊ लागतात. मनुष्यवस्तीतील शेतं ही त्या बाहेर आलेल्या हरणं, सांभार, गव्यांसाठी नवी कुरणं होतात आणि त्यांचा माग घेत घेत जंगलातले मांसभक्षीही तिथे शिकारीसाठी वास्तव्य करू लागतात. हे सगळं माणसाच्या नजरेआड आणि मग कधी कधी माणसाच्या नजरे समोर वर्षानुवर्ष चालत असतं.

Pic Credit: https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRkiJtCQ-bdibNZGY5rTjK2MvwsbLfbSX5AY1flEVpveUWO6Zqo-w&s

आपलं गीरचं जंगलही त्याला काही अपवाद नव्हतं. जंगलातल्या हरणांना १२ महीने शेतात मिळणा-या मेजवानीचा सुगावा लागला होता. शेतातली माणसं दिवस ढळल्यावर घराकडे परतत हे ही त्या हरणांनी हेरून ठेवलं होतं. त्यामुळे रात्र झाल्यावर ते शेतात शिरत आणि पिकांचा फडशा पाडत.

गावातल्या लोकांनाही ह्याची चाहूल लागली होती आणि म्हणून ते ही शेतावर आळीपाळीनी गस्त घालात. हरणं शेतात घुसली की गस्तीवरची माणसं हाळी देऊन बाकीच्यांना जागं करत आणि मग सगळे मिळून आटापिटा करून त्या हरणांच्या झुंडीला पळवून लावायचा प्रयत्न करत. रोजचाच हा जणू खेळ झाला होता आणि हे गावकरी त्या हरणांना चांगलेच कंटाळले होते.

Pic Credit: https://images.app.goo.gl/AgFfwcks7yVEx6Jh7

गावाजवळच्या एका टेकडीवरून स्वतःच्या कळपातून सिंहाच्या रीतीप्रमाणे नुकताच बाहेर निघालेला एक तरुण सिंह बरेच दिवस हा सगळा प्रकार बघत होता. त्यला कळून चुकलं होतं की गस्तीवरच्या माणसांनी हाळी दिली ह्याचा अर्थ हरणं शेतात शिरलीयत. जुन्या कळपातून आलेल्या शिकारीच्या अनुभवावरून त्यानी हे ही ओळखलं होतं की हरणं जेव्हा ओळखीच्या परीसरात नसतात तेव्हा अधिक भेदरलेली असतात. शेत आणि पुढे मानवी वस्ती असल्याने, पळून जायला, लपून राहायलाही फारशी जागा नसते आणि त्यामुळे सहज शिकार बनू शकतात.

Pic Credit: https://images.app.goo.gl/K6EkRwVk7Gfpr4pX8

प्रश्ण फक्त एवढाच होता की भर वस्तीत माणसाच्या इतक्या जवळ जाणं ह्यात मोठा धोका होता. कारण माणसाचा काही भरवसा नाही. माणसा इतका मायाळू आणि माणसा इतका क्रूर जगात दुसरा प्राणी नाही. हाळी ऐकून आपण हरणांची शिकार करायला जायचं आणि तेव्हढ्यात गावातली बाकीची माणसं आली तर हरणं सोडून ती आपल्याच मागे लागायची आणि आपला नाहक बळी जायचा अशी त्या तरूण केसरीची रास्त भिती होती.

पण त्याला इतकी सहज शिकार सोडून देणं हे मुर्ख पणाचं आहे हे ही कळत होतं. आणि त्यच्या डोक्यात एक कल्पना सुचाली. धोका पत्करायचा पण मोजुनमापून आणि नियोजनपुर्वक.

रोज रात्री टेकडी ऐवजी शेताजवळच्या झाडीत कोणाला दिसणार नाही असं लपून राहायचं. म्हणजे हळी ऐकून टेकडी उतरून येण्याचा वेळ वाचेल. माणसाची हाळी आली की तत्क्षणी सर्वात जवळचं सावज हेरून शिकार करायची आणि गावातली माणसं यायच्या आत शिकार घेउन झाडीत गायब व्हायचं.

Pic Credit: https://images.app.goo.gl/NTpDa6ib4tBXrNY78

ह्या नियोजनबद्ध आणि मोजका धोका पत्करण्याचा त्याला फायदाही होऊ लागला. फारसे कष्ट न घेता त्याला शिकार मिळू लागली. त्यानी ही मोठ्या दिलदार मनानी त्याची ही युक्ती त्याच्या इतर तरूण, कळपातून नुकत्याच बाहेर पडलेल्या मित्रांना सांगितली. बघता बघता शेतावरच्या हरणांची शिकार करणारी सिहांची टोळीच तयार झाली.

आता हाळी वाजली की सिंह यायचे, शिकार करायचे त्यांना शिकार करताना बघून बाकी हरणं जंगलात पळून जायची. गावातून जागी होऊन माणसं यायच्या आत शेत मोकळं!

Pic Credit: https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRbjP7sWIdXhs_nvJeu-8aVbLIl4jMjExVeCE0HJi3RvJeL_luFxw&s

काही हुशार गावक-यांना हा सगळा प्रकार कळून चुकला. सिंहांना घाबरण्याची नाही तर उलट त्यांना बोलावण्याची गरज आहे हे त्यांना उमगलं. शेतात हरणं शिरली की गावातून कोणी यायची गरज नाही की आटापिटा करून हरणांना हुसकावण्याची ही गरज नाही. एक हाळी मारायची, सिहांना बोलवायचं आणि स्वस्थ बसायचं. एकमेकांना मदत करून जीवन कीती सोपं होतं!

Pic Credit: https://images.app.goo.gl/aSnEDP87Q5LCc1aN9

सिंह आणि माणसाची अशी दोस्ती झाल्याचं दुसरं कुठलं उदाहरण नसेल! आणि भोळ्या हरणांना त्यांच्या ह्या योजनेचा सुगावा लागे पर्यंत तरी ही दोस्ती अशीच अबाधित राहील.

तात्पर्यः १. बारकाईनं निरिक्षण केलं तर मोठे मोठे प्रश्ण सहज सुटतात.
      २. मोजकाच पण नियोजनपुर्वक पत्करलेला धोका चांगलीच फळं देतो.
      ३. इतरांना केलेल्या मदतीचा तुम्हालाही फायदा होतो.
      ४. माणुस आणि प्राणी गुण्या गोविंदानी राहू शकतात.

_______________________________________________________________________

"नाही म्हणजे नाहीच!" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ५
"घे भरारी" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ६

No comments:

Post a Comment