Monday, September 23, 2019

धग...




खुप दिवसात असं लिहिलंच नाही काही
खोल मनातलं बाहेर दाटुन आलं नाही

खुपण्याची, दुखण्याची, अडण्याची, पडण्याची
भुतंच होऊन गेली होती सवईची

आपलं आपण असण्याची / नसण्याची
गरजच काय कोणाला काही सांगण्याची?

त्यांचं त्यांचं चालू असतं, तुमचं तुमचं चालू असतं
आणि त्यातून मुळात, तुमचं कोणाला ऐकायचं असतं?

सोडून जेव्हा दिले होते व्यक्त होण्याचे खेळ
आजच अशी अचानक ही कुठली आलीय वेळ?

झरे बिरे जाणीवेचे जरी आटून गेले पाठी
कवितेच्या अश्या ओळी तरी कुठुन आल्या ओठी!!

जागं होतय सारं की नव्यानी जन्मतय काही
धग ही चैत्यन्याची देवा, चेतवत राहो पाही...
देवा चेतवत राहो पाही...