Thursday, January 5, 2023

छोट्या सादर कर्त्यांसाठी...

 माझा मुलसाठी - अर्हतसाठी - शाळेत, वेगवेगळ्या स्पर्धांमधील सादरि‍करणासाठी जस जसे लिहित जाईन तस तसे इथे जोडत जाईन...

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पपेट शो - ईस्रो चले हम!


लिखाण वर्षः  सप्टेंबर २०२३

सादर कर्त्यांचे वयः ६ - ७ वर्षे 

सादरि‍करणास लागणारा वेळः ४ -४.५ मिनिटे


Image curtesy: compiled from web

(छोटाभीम च्या गावाचा देखावा असलेला पडदा असतो. त्यावर, खालील गाणी म्हणत एक एक पपेट अवतरतात)

छोटा भीमः    भीम भीम भीम… छोटा भीम छोटा भीम… (२ वेळा)

स्पायडरमॅनः    स्पाडरमॅन स्पाडरमॅन… डज व्हॉटेवर अ स्पाडर कॅन… (२ वेळा)

डोरेमॉनः       कम इन थ्रू द मॅजिक डोअर… कम अँड मीट डोरेमॉन… (२ वेळा)

             (जॅपनीज पद्धातीने मान झुकवुन) कोनीचीवा छोटा भीम… Hi!

छो.भी.        आईशप्पथ! नमस्कार डोरेमॉन!

स्पाः          (हस्तांदोलन करून) Hey man! Hello!

छो.भी.:        (प्रवीण तरडे शैलीत) आयायायायाया…. नमस्कार स्पायडऱ्या!

डो.:           स्पायडरमॅन तू इथे!

स्पा.:         डोरेमॉन, तू पण इथे!!

छो.भी.:       अरे, हा प्रश्ण तर मी तुम्हाला विचारायला पाहीजे! डोरेमॉन तू जपानहून आणि   स्पायडरमॅन तू यू.एस.ए. हून इथे भारतात काय करताय!

स्पा.:         अरे काय करतोय म्हणजे काय? तुमच्या ईस्रोनी कामच तस केलय ना भावा!

डो.:           हो रे! आम्ही जॅपनीज लोक अजूनही आमचं यान चंद्रावर उतरवू शकलो नाहीयोत!

छो.भी.:        खरं यार! ईस्रोचे शास्त्रज्ञ भाररीचेत!

स्पा.:         नक्कीच! भारत हा जगातला ४था देश आहे चंद्रावर पोचलेला!

डो.:           आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचलेला पहीला देश!

छो.भी.:        ते ही खूप कमी खर्चात!

तिघेः         पार्टी ना भो!!!

स्पा.:         म्हाणूनच तर आम्ही ईस्रो बघायला आलोय!

छो.भी.:       अरे आमच्या इथले हुशार हुशार विद्यार्थी अमेरीकेला, जपानला जातात आणि तुम्ही   इकडे आलायत!

डो.:          मित्रा तुमच्या ईस्रोनी कामच असं झकास केलय की काय सांगू… एकदम खास! चलाना   यार, आपण सगळे ईस्रोत जाउन बघू अजून काय काय करणार आहेत ते!

(ईस्रोशी निगडीत चित्रे असलेला पडदा पडतो तेव्हा स्कूल चले हम च्या चालीत…)

स्पा.:         डोरेमॉन को लेकर…

डो.:          स्पायडरमॅन को लेकर…

छो.भी.:       ईस्रो चले हम!

(ह्याच ओळी पुन्हा म्हणतात तोवर ईस्रोचा पडदा खाली आलेला असतो)

स्पा.:         तर आता चंद्रयान ३ नंतर पुढे काय?

डो.:          आदित्य एल१ सुर्याचा आभ्यास करायला आत्ताच गेलय!

छो.भी.:       त्यानंतर गगनयान!!! भारत पहील्यांदाच अवकाषात माणूस घेउन जाणार!

स्पा.:         मग मंगळयान २, चंद्रयान ४, शुक्रयान १ अशी लाईनच आहे की भावा!

डो.:          हो रे! म्हणजे भारतातल्या हूशार हूशार विद्यार्थ्यांना ईस्रोतच ररग्गड काम आहे की!

छो.भी.:       ह्म्म्म!! मी ठरवलय! भरपूर आभ्यास करायचा, IISc, IIT मधे जायचं आणि माझ्या   भारत देशात राहूनच, भारतासाठी, ईस्रोसाठी काम करायचं!

स्पा.:         आणि असं झालं तर तुम्हीच काय पण आमच्या यू.एस.ए. आणि जपानचे शास्त्रज्ञही   भारतात येऊन काम करतील!

तिघे:         (आनंदून) सही!!!

             चंदामामा दूर के…

             लल लल लल लाला…

             अब एक छोटी टूर के…

             लल लल लल लाला…

             ईस्रो के सांयटीस्ट महान हैं! (२ वेळा)

             भारत मॉंकी शान हैं! (२ वेळा)

             शान हैं भाई शान हैं!... (२ वेळा)

             लल लल लल लाला… (३ वेळा)

 

----------------------------- समाप्त-------------------------------



नाट्यछटा - निरोप

लिखाण वर्षः २०२२

सादर कर्त्याचे वयः ६ - ७ वर्षे 

सादरि‍करणास लागणारा वेळः ४ मिनिटे


Image curtesy: https://www.udayavani.com/english-news/ravi-jadhav-to-direct-historical-film-bal-shivaji 

मा‍झ्या प्रिय सौंगड्यांनो, आज निरोपाचा दिवस. औसाहेब म्हणतायत, आज मावळातून मुक्काम हलवायला लागणार आम्हाला. नाहीतर आदिलशाही फौजा हल्ला करतील.

अरे… अरे असे खट्टू नका होऊ. आम्हाला ह्या गावाहून त्या गावी फिरत राहावं लागतय खरं, पण औसाहेब म्हणतात, “शिवाजीराजे, आपल्या वडीलांनी – शहाजीराजांनी मुघल फौजेला परतवून लावलं, की थांबेल हो, आपली परवड. पण असा विचार राजे की तुम्हाला अवघ्या ५ – ६ वर्षांच्या आयुष्यात, आपला महाराष्ट्र फिरता येतोय. कुणाला मिळतं सांगा असं सौभाग्य?”

आणि खोटं का आहे ते दोस्तांनो? आता हेच बघा, हणम्याच्या घरची कांदाभाकर, परसूच्या दारात आपण केलेला किल्ला, नाम्याच्या रानातला विटी-दांडूचा खेळ, वाघाची हुबेहूब डरकाळी काढणारा जन्या, हे हे सगळं, आम्ही इथे आलोच नसतो तर कसं मिळालं असतं आम्हाला?, सह्याद्रीचे वेगवेगळे डोंगर कसे फिरलो असतो आम्ही? तुमच्या सारखे सौंगडी कसे मिळाले असते?

काय़ म्हणता? आम्ही विसरू तुम्हाला? मुळीच नाही… आमच्या मागच्या मुक्कामाचे वेगवेगळे दोस्त – तानाजी, येसाजी, बाजी सारे याद आहेत आम्हाला आणि आम्हाला विश्वास आहे – त्यांनाही असू आम्ही याद.

पण इथून जाताना मात्र तुमच्या कडून एक वचन हवय आम्हाला. द्याल आम्हाला ते वचन?

तिन्ही सांजेला दिवेलागण झाली की औसाहेब ज्या गोष्टी आम्हाला सांगतात त्या आम्ही तुम्हाला सांगितल्या. आम्हाला वचन हवय तुम्ही त्या गोष्टी नाही विसरायच्या. रामाचा पराक्रम, श्रीकृष्णाचं धैर्य ध्यानात ठेवायचं. अन्याय सहन न करणाऱ्या पांडवांची गोष्ट, भिमाची विरता विसरायची नाही. औसाहेब म्हणतात त्यांचे हेच गुण आपल्या सगळ्यांमधे आहेत. आम्हाला वचन हवय तुम्ही हे सगळं विसरणार नाही.

आपलं हे गाव मोठं थोर, समर्थ रामदास इथे येऊन गेले. त्यांनी तुम्हाला कसरती, व्यायाम करायला सांगितलाय. आपले मराठावीर हे श्रीमारुतीराया सारखे धष्टपुष्ट, बलदंड झाले पाहीजेत. असं ते म्हणाले होते. हो ना? आम्हालाही अगदी हेच वाटतं. तेव्हा आम्हाला वचन द्या की आपली परत भेट जेव्हा होईल तेव्हा आमचा प्रत्येक दोस्त भिमाचा अवतार असला पाहीजे. कराल आमच्यासाठी हे?

आणि हो, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा देवळा-रावळांमधे जा. ज्ञानदेवांचे अभंग गा, तुकाराम महाराज कधी आले तर त्यांचं किर्तन ऐका. औसाहेब म्हणतात कनवाळू विठुराय जसा आपला देव तसा महाभयंकर नृसिंहही! ह्या आपल्या देवांची लाज आपणच तर राखायची ना!

तेव्हा आता आपली परत भेट होईपर्यंत हे सगळं विसरायचं नाही!! आणि बोला – हर हर महादेव… जय भवानी!!!

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


बडबडगीत - नकोच तो मोबाईल

लिखाण वर्षः २०२१

सादरकर्त्याचे वयः ५ - ६ वर्षे 

सादरीकरणास लागणारा वेळः १ - २ मिनिटे


Image Curtesy: https://www.vecteezy.com/vector-art/5112696-cartoon-mobile-phone-mascot-pointing-up

मोबाईल बघायचा नाही असं ठणकावून सांगतो बाबा (२)

तू ही बघतोस म्हणलं तर होतो कावरा-बावरा!

म्हणतो कसा झंप्या भावड्या, लहानेस ना तू, (२)

डोळे तुझे नाजुक अजून येईल पाणी खूप

त्याचे म्हणे डोळे झालेत, खूप खूप स्टॉंग (२)

चष्म्या शिवाय तरी त्याचं होत नाही काम (२)

मला मात्र बाबासारखा नक्को मुळ्ळीच चष्मा, (२)

मोबाईल जरी नसला तरी चालेल मग मला! (२)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------