Saturday, December 14, 2019

"पुर्णमिदं स्वरूपं" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - १


माझ्या पावणे तीन वर्षांच्या मुलाला झोपवताना सुचलेली ही गोष्टं. पण मोठ्यांनाही रुचेल अशी.

पुर्णमिदं स्वरूपं
(हे स्वरूप संपुर्ण आहे)


Pic credit: https://www.dreamstime.com/lush-dense-green-forest-sun-rays-touching-plants-trees-highly-detailed-vector-illustration-sun-rays-shining-image120234740


कोण्या एके काळची ही गोष्ट आहे, एक घनदाट जंगल होतं. गोष्ट कोण्या एका काळचीच आहे. कारण जंगल खरच खूप घनदाट होतं! इतकं की त्या जंगलात बरेच वाघ; आणि सिंहांचे काही कळप सुखाने नांदत होते. वाघ एकटे एकटे राहून शिकार करत तर सिंह कळपात राहून शिकार करत.

एके दिवशी, केवळ योगा योग म्हणा किंवा काही, एक ढाण्या वाघ आणि सोन सिंहांचा एक कळप शेजारी शेजारी राहु लागले.

ढाण्या वाघ रोज सिंहाना कळपात शिकार करताना बघायचा. सगळे सिंह मिळून अगदी सहज मोठे मोठे गवे, वयात येत असलेले हत्ती शिकारीत मिळवत असत आणि मग एकदा शिकार केली की पुढचे काही दिवस त्यांना परत शिकार करायची गरज नसे.

Pic credit: https://www.microsoft.com/en-us/p/lion-family-sim-online/9pn8vdt79gkj#activetab=pivot:overviewtab

पण वाघाचं तसं नव्हतं. त्याला एकट्यालाच शिकार करावी लागे आणि त्यामुळे हरणं, रानडुक्कर अशा छोट्या शिकारी पकडून त्याला समाधान मानवे लागे. परत शिकार छोटी असल्याने वारंवार शिकार करावी लागे. तो ह्या घोर मेहनतीला पार कंटाळून गेला होता.

Pic credit: https://www.microsoft.com/en-us/p/wild-tiger-jungle-hunt-african-animal-hunting/9nblggh1nht3#activetab=pivot:overviewtab

काही दिवसांनी वाघाला वाटायला लागतं की ह्या सिहांना किती आराम आहे. आपल्या सारखी रोज रोज मेहनतही करावी लागत नाही, शिकारीची जबाबदारीही एकट्यावर नाही. आरामात चालू आहे त्यांचं. मग तो ठरवतो. आपणही सिहांसारखा कळप करून राहायचं आणि जो पर्यंत आपला वाघांचा कळप होत नाही तोपर्यंत शिकारच नाही करायची! हे आळशी सिंह जर ते करू शकतात तर आपण तर नक्कीच करू शकू.

झालं. आता हा आपला ढाण्या वाघ कळप जमवण्या साठी ईतर वाघ शोधत फिरू लागतो. बरेचसे वाघ त्याला वेड्यात काढतात. काही काही वाघ तर त्या ढाण्या वाघाला आपल्या हद्दीत घुसलेलं पाहून त्याच्यावर हल्ला चढवतात.

Pic credit: https://www.trademe.co.nz/home-living/home-d%c3%a9cor/posters/other/listing-2440681048.htm

बघता बघता असे दिवस गेले, आठवडे सरले, पण आपला ढाण्या वाघही फार जिद्दीचा. त्यानी काही चिकाटी सोडली नाही. आणि सरते शेवटी एक एक करत करत वाघ त्याच्या आमिषाला बळी पडत कळपात सामिल व्हायला लागतात. सगळ्यांनी एकच ठरवलेलं असतं. आता सिहां सारखं कळप जमल्याशिवाय शिकार करायची नाही. आणि एकदा का कळप जमला की आरामात शिकार करायची.

सरतेशेवटी, ७ – ८ वाघांचा कळप जमतो. आणि ते सगळे शिकारी करू लागता. कोणी दबा धरून बसे, तर कोणी मधेच पुढे निघून जाई, कोणी एक सावज हेरे तर कुणी दुस-याच सावजावर हल्ला चढवी. त्यांच्यात काही केल्या काही ताळमेळ बसेना. असेच बरेच दिवस चालू होते. पण जस जसे दिवस सरत होते तस तसे पोटात काहीच अन्न न गेल्यामुळे ते सगळे वाघ अतिशय अतिशय क्षीण, दुबळे होत चालले होते. इतके क्षीण की आता एकट्यानेही शिकार करायची ताकद त्यांच्यात उरली नाव्हती.

Pic Credit: https://www.gograph.com/clipart/deforestation-scene-with-weak-tigers-gg118862497.html

सोन सिंहांच्या कळपाचा राजा त्या वाघांची ही गंमत पाहात होता. आणि एक दिवशी न राहावून तो त्या वाघांना भेटायला गेला.

त्यांना तो म्हणाला, “नमस्कार शेजा-यांनो. गेले कित्येक दिवस मी तुमची कसरत बघतोय. पण असं बघा, तुम्ही वाघ आहात आणि आम्ही सिहं आहोत. परमेश्वरानं म्हाणा, निसर्गानी म्हणा आपली रचनाच वेगवेगळी केलीय. जसं ठरवूनही आम्ही एकटे एकटे शिकार करू नाही शकणार तसच ठरवूनही तुम्ही ही आमच्या सारखी कळपात शिकार नाही करू शकणार. मुळात तशी गरजही नाहीये. आपलं मेंदू, शरीर, मन सगळं सगळं आपापल्या शिकार पद्धतीला साजेसं बनवलय. त्याची किंमत नको का आपणच करायला?

तुम्हाला वाटतं खरं, की आमचं सगळं आरामात चालू आहे. पण आम्हाला आमच्या कळपाला पुरेल एवढी मोठी शिकार नाही मिळाली तर, उपाशीच झोपावं लागतं. आमच्या पेक्षा थोरा मोठ्यांचं ऐकावच लागतं. आम्ही तुमच्या सारखे स्वतःच्या मनाचे राजे नाही आणि तुमच्या सारख्या छोट्या छोट्या शिकारी करून आमचं भागणारही नाही. पण म्हणून काय आम्ही स्वतःला कमी लेखून घ्यायचं? मुळीच नाही!

आपल्याला एकमेकां सारखं बनण्याची गरज नाहीये. आम्ही जसे आहोत तसे स्वयंपुर्ण आहोत. आणि तुम्ही जसे आहात तसे तुम्ही स्वयंपुर्ण आहात. त्यामुळे असं आंधळेपणाने कोणासारखं बनण्याचे प्रयत्न सोडा आणि स्वतःची खरी ताकद, खरी किंमत ओळखा.”

Pic credit: https://www.dailymotion.com/video/x2wv0qt

सोन सिंहाचं म्हणणं सगळ्या वाघांना मना पासून पटतं. तो पुढे म्हणतो, “तुम्ही आमचे शेजारी. तेव्हा तुमच्या अडचणीच्या काळी तुम्हाला मदत करणं आमचं कर्तव्य आहे. तेव्हा आम्ही सगळे सोन सिंह मिळून तुमच्या साठी एक मोSSठी शिकार आणून देतो. खूप महीन्यात तुम्ही काही खाल्लेलं नाही. उपाशि असाल. पोटभर खाऊन घ्या आणि आपापल्या मार्गानी जा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि होतात तसे आनंदानी राहायला लागा”.

त्यानंतर मात्र वाघांनी असा वेडेपणा केल्याचं ऐकीवात नाही!

तात्पर्यः १. स्वतःवर विश्वास ठेवा.
      २. सारासार विचार केल्याशिवाय आंधळेपणाने कुठलीही कृती करू नका.