"नाही म्हणजे नाहीच!" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ५
“व्हाऊऊऊऊSSS”
“व्हाऊऊऊऊSSS”.... मध्यप्रदेशातलं पेंच जंगल, तिथल्या सगळ्यात मोठ्या जंगली कुत्र्यांच्या
झुंडीच्या ह्या आवाजानी दणाणून सुटलं होतं. अर्थात त्याला कारणही तसंच होतं. ह्या भल्याथोरल्या
झुंडीच्या सगळ्यात लहान कुत्र्यांच्या जोडप्याला पिल्लं झाली होती. आणि सगळी झुंड त्या
आनंदात भुंकत संपुर्ण जंगलाला जणु तो आनंद सांगत होती.
Pic Credit: https://images.app.goo.gl/mxwyRtT1MBVucUjH8 |
ही
जंगली कुत्री झुंडीनी मिळून मिसळून, सुत्र बद्ध पद्धतीनी सावज हेरून शिकार करण्यात
फार प्रसिद्ध आहेत. जेव्हा झुंडीतली बाकी कुत्री शिकारीला
जंगलात जातात तेव्हा त्यांच्या परंपरेनुसार आपली पहीलटकरीण कुत्री आपल्या पिलांची आणि त्याच बरोबर झुंडीतल्या
इतर छोट्या कुत्र्यांची काळजी घ्यायला, त्यांच्यावर लक्ष ठेवायला, त्यांच्या बरोबर गुहेतच
थांबे. दिवस मावळल्यावर जेव्हा बाकी झुंडीतली कुत्री शिकार करून परतत तेव्हा तोंडात
भरून आणलेलेल शिकारीचे तुकडे ओकून सर्व पिल्लांना आणि नव्या आईला खाऊ घालत.
Pic Credit: https://images.app.goo.gl/sTcdRsapyttJzszE7 |
आपलं
कुत्र्याचं जोडपं झुंडीत सगळ्यात लहान जरी असलं तरी एक उत्तम माता पिता होते. जसजशी
ह्या लहान जोडप्याची पिल्लं मोठी होऊ लागली तसतशी त्यांची भूकही वाढू लागली आणि नव्या
आईला आता आपणही आपल्या झुंडीबरोबर जाऊन शिकारीत त्यांना मदत करून आपल्या पिल्लांसाठी
भरपूर शिकार घेऊन यावी असं वाटू लागलं. पण आपल्या, इतरांच्या एवढ्या पिल्लांना दिवसभर
एकटं ठेउन शिकारीला जाणार कसं हा मोठा प्रश्ण होता.
एके
दिवशी रात्री सर्व झुंड शिकारीवरून येऊन खाऊन पिऊन आपल्या गुहेत निवांत गप्पा मारत
बसलेली असताना, ह्या नवीन जोडप्यानी झुंडीतल्या इतर मोठ्या कुत्र्यांपुढे हा विषय काढला.
सगळ्या मोठ्या कुत्र्यांना तीचं म्हणणं पटत होतं, पण तिच्या ऐवजी पिल्लां बरोबर कोण
थांबणार, हा प्रश्ण काही सुटत नव्हता. शेवटी म्हातारा होत असलेला कुत्रा त्यांना म्हणाला, “हे बघा, मी आता म्हातारा होत चाललोय, पुर्वी सारखी शिकारीची दगदग आता माझ्याच्यानी
होत नाही. तेव्हा मी पिल्लांची देखभाल करत गुहेत थांबेन, तुम्ही बाकी सगळे निर्धास्त
शिकारीला जा”. हे ऐकून सगळ्यांना फारच हायसं वाटलं आणि लगेच दुस-याच दिवशी पासून आपली
नवीन आई शिकारीला जाऊ लागली. एवढ्या वयो वृद्ध, अनुभवी कुत्र्याच्या देखरेखीत आपली
मुलं वाढणार ह्या कल्पनेनीच ती कुत्री भयंकर खुष झाली.
Pic Credit: https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTiK4jOddvxIkzYkQhIdmQB4vtU_vEWHHBQZfoMScH86p9sg1kX&s |
ही
कुत्री शिकारीला दिवसभर जायला लागल्या पासून काहीच दिवस झाले असतील. तिला तिच्या सगळ्यात
लाडक्या गोड गोंडस पिल्ला मधे बदल जाणवू लागला. तो गप्प गप्प राहू लागला, त्यानी खाणं
पिणं एकदम कमी केलं, सतत भेदरलेला तरी असे किंवा रागवलेला तरी असे. इतके दिवस बरोबर
असलेली आई अचानक शिकारीला जाऊ लागल्यामुळे असं झालं असेल असं त्या नवीन जोडप्याला वाटलं.
पण दिवसें दिवस ते गोड पिल्लू अधिकच एकलकोंडं, कावलेलं राहू लागलं आणि आता मात्र हे
फार वेगळं प्रकरण आहे हे त्यांना जाणवलं. खोदून खोदून त्यांनी विचारल्यावर कुठे ते
निरागस पिल्लू बोललं, “आंSS मलाना ते दिवसभर आमच्या बरोबर थांबणारे आजोबा नाही आवडत.
ते ना मला एकट्यालाच गुहेपासून लांब घेऊन जातात आणि माझे लाड करतात. पण ते तुमच्या
दोघांसारखे आवडणारे लाड नाही करत. घट्ट मिठित धरून ठेवतात, उगाचच कुठे कुठे पाप्या
घेत बसतात, माझ्या सगळ्यां समोर न दाखवायच्या अंगाला घासून घासून हात लावतात... श्शीSSS
मला नाही आवडत ते. आई, मला नाही थांबायचं त्यांच्या सोबत. तूच थांब ना गंSSS”.
Pic Credit: https://images.app.goo.gl/gopXHnoL6D3x4giw9 |
आपल्या
लाडक्या पिल्ला कडून हे सगळं ऐकून त्यांना मोठा धक्काच बसला. क्षणभर काय करावं, काय
नाही हे त्यांना कळेचना. आपण आपल्या पिल्लांना असं कोणी केलं तर मोठ्यांदा नाही म्हणायचं
आणि आपल्याला येऊन सांगायचं हे का नाही सांगितलं? आपल्या ह्या एवढ्याश्या बाळानी काय
काय भोगलं असेल याची त्यांना कल्पनाही करवेना. पण मग नंतर विचार आला की आपल्या बाळाला
काही तरी गैरसमज झाला असेल. तो वृद्ध, अनुभवी कुत्रा असं नाही करणार. आपल्या झुंडीत
उगाच का त्याल मानाचं स्थान आहे? तरी पण एक सुरक्षेचा उपाय म्हणून ते पिल्लाला सांगतात
“बाळा तू घाबरू नकोस. आई बाबा तुझ्या बरोबर आहेत. उद्या परत असच झालं तर तू जोरात,
नाही किंवा थांबा असं ओरड आणि लगेच आम्हाला सांग”. आई बाबांच्या ह्या बोलण्यानी पिल्लाला
जरा धीर येतो आणि तो “हो” म्हणून खेळायला जातो.
दुस-या
दिवशी तो वृद्ध कुत्रा पिल्लाच्या जवळ येतो तेव्हा ते पिल्लू काल आई बाबांनी सांगितल्या
प्रमाणे “नाही” म्हणून जोरात ओरडतो. अचानक आलेल्या ह्या प्रतीसादामुळे तो वृद्ध कुत्रा एकदम गांगरून जातो. त्यातून बाकी
पिल्लांचं ही तिकडे लक्ष जातं आणि तो मागे वळतो. हे सगळं पाहून त्या पिल्लाला हायसं
वाटतं.
Pic Credit: https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn%3AANd9GcRnZVRhmyrQICQhJZjm4e2st5AsicI7MFK8XQ8n72T8NdBxk0zQ |
असेच
काही दिवस जातात तो वृद्ध कुत्रा त्या दिवसा पासून पिल्लाच्या जवळ येत नाही. आपल्या
बाळाच्या वागण्यात एक नवा आत्मविश्वास आलेला पाहून त्याचे आईबाबापण निर्धास्त होतात.
पण
एके दिवशी कुणाचं लक्ष नाही बघून तो वृद्ध कुत्रा पिल्लाला परत गुहे पासून लांब घेऊन जातो आणि धमकावतो, “परत जर मी जवळ आल्यावर मोठ्यांदा ओरडलास किंवा आपली गंमत
इतर कोणाला सांगितलीस तर वाघाच्या गुहे समोर तुला नेऊन सोडून येईन. तो वाघ माझा चांगला
मित्र आहे. तुला एका घासात तो फस्त करून टाकेल”. आता मात्र त्या निरागस पिल्लाला काय
करावं ते कळेना. जिवाच्या भितीने तो निमूट वृद्ध कुत्र्याला सहन करू लागला.
आपल्या
पिल्लामधे परत झालेला बदल त्या आई बाबांनी लगेच टिपला आणि काही तरी नक्की गडबड आहे
हे त्यांना कळून चुकले. काय होतय ह्याची खात्री करण्यासाठी त्यांनी एक युक्ती ह्यावर
योजली. दुस-या दिवशी नेहमी सारखे सगळ्यांबरोबर ते शिकारीला निघाले, पण आई शिकारीला
जात नाही. गुहे जवळच्याच झुडपात ती लपून बसते. ह्या सगळ्या योजनेची माहीती नसल्याने
तो वृद्ध कुत्रा पिल्लाला नेहमी प्रमाणे त्रास द्यायला लागताच ती झुडपानून बाहेर येते आणि त्या म्हाता-या कुत्र्यावर ह्ल्ला करून आपल्या पिल्लाला मिठित घेते.
Pic Credit: https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTgxEz5mQkZ56IFnncBoqMq90Wyovhw8m-EQYejKOtnAmrr7TwH&s |
संध्याकाळी
शिकारी वरून परत आल्यावर तिने झालेला सगळा प्रकार झुंडीतल्या सगळ्यांना सांगितला. ह्याची
गंभीर दखल झुंडीतल्या मोठ्या कुत्र्यांनी घेतली आणि त्या म्हाता-या कुत्र्याला झुंडीतून
बाहेर काढलं. इतकच नव्हे त्याच्या ह्या वागण्याची तक्रार त्यांनी पेंच जंगलाच्या राजाकडे
म्हणजे त्या वाघाकडेही ही केली की जेणे करून त्याला योग्य ती शिक्षा होऊन जंगलातल्या
इतर कुठल्या पिल्लांना असा त्रास ह्याच्या मुळे किंवा इतर कोणा मुळे होऊ नये.
ह्या
घटणे नंतर पिल्लू हळू हळू बरं होऊ लागलं. झालय ते पूसता तर कोणालाच येणार नाही, पण सगळ्यांच्या
प्रेमामुळे ते पिल्लू आता आनंदी राहाण्याचा प्रयत्न करतय.
तात्पर्यः
१. अन्यायाला प्रतीकार केलाच पाहीजे.
२. चूक कोणीही केलेली असो, त्या चुकीला योग्य
ती शिक्षा झालीच पाहीजे.
_________________________________________________________________________________