Saturday, May 16, 2020

"घे भरारी" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ६



"घे भरारी" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ६


काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भारतात त्या काळी 'ए - वन ' सर्कस खूप प्रसिद्द होती. त्या काळी सर्कसीत हत्ती, घोडे, वाघ, सिंह असे सगळे प्राणी आणि विविध पक्षी असायचे. या सगळ्या प्राणी आणि पक्षांची देखभाल सर्कशीचे मालक जातीनं करत. कुठल्याही प्राण्यांवर जोर जबरदस्ती ना करता त्यांच्या कला कलानं घेत कसरती करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता.

Pic Credit: https://freedesignfile.com/567891-circus-background-cartoon-styles-vector-02/


ए वन सर्कसचं वाघ सिंहां खेरीज एक खास आकर्षण होतं काकाकुवा पक्षांनी केलेल्या कसरती. छोट्य छोट्या दांड्यांवरून, पाळण्यांवरून, छोट्या गाड्यांवरून एका मोठ्या मंचावर गिरक्या घेत, फे-या मारत, उलटे सुलटे होत, वेगवेगळे आवाज काढत, झोके घेत कसरती दाखवणारे पांढ-या, गुलाबी, राखाडी, पिवळ्या, काळ्या रंगाचे काकाकुवा सर्कसीत बहार आणायचे.

Pic Credit: https://images.app.goo.gl/f7uXcoh2xJDhf2B88

पण एक काकाकुवा मात्र ह्यात हीरीरीने भाग घेत नसे. ह्या कसरती करताना तो खूप उदास असे. सर्कस संपली की मात्र तो पिंज-यात उंच उंच भरा-या मारत असे. त्यात त्याला मनापासून आनंद वाटे. इतर काकाकुवांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की, "अरे, आपले मालक खूप चांगले आहेत. आपली खूप काळजी घेतात. तेव्हा आपलंही काम आहे की आपण कसरती मनापासून कराव्यात".

त्यावर तो म्हणे, "आपले मालक चांगले आहेत ह्यात कुठलीच शंका नाही. पण कसरती करण्यात मला मजाच येत नाही. माझा आनंद उंच उडण्यात, भरारी मारण्यात आहे. तुम्ही सगळे कसरती करताय म्हणून मला जे मनापासून आवडतं ते मी सोडून देऊ हे काही मला पटत नाही."

Pic Credit: https://images.app.goo.gl/PQMbEaMNuDq97FPw8

त्यावर बाकी काकाकुवा त्याला सांगत, "उगाच प्रवाह विरुद्ध धावण्याच्या गप्पा मारू नकोस. सर्कसीतच आपला जन्म झाला, आपण सर्कसीतच वाढलो. ही सर्कस हेच आपलं जीवन आणि कसरती हेच आपलं जगणं". मग तो म्हणे, "मी कुठे सर्कस सोडून जाण्याचा विचार करतोय? मी फक्त माझ्याशी प्रामाणीक राहाण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सगळे करताय; म्हणून मला ज्या गोष्टीची मना पासून ओढ लागलीय आणि त्यासाठी कितीही कष्ट करण्याची माझी तयारी आहे ती मी सोडून देउ?".

सर्कसीचे मालक काकाकुवांचं हे बोलणं ऐकत होते आणि त्यांनी सर्वांना थक्क करणारा एक निर्णय घेतला. त्यांनी त्या ध्येयवेड्या पक्षाला पिंज-यातून बाहेर काढलं आणि मुक्त केलं. त्याला तो म्हणाला, "जा उड. जितकं उंच उडायचं  तितकं उड, त्यासाठि सर्कसीतून बाहेर पडावं लागलं तरी माझी त्याला ना नाही. मी तुझ्या बरोबर आहे". मालकांच्या ह्या उदारपणामुळे त्या काकाकुवाला खूप गलबलून आलं. तो त्यांना म्हणाला, "मनापासून धन्यावाद मालक. मला जे करायचय ते करायला मला सर्कस सोडण्याची बिलकुल गरज नाहीये. मी ईथेच राहून ते करेन. फक्त मला काही दिवस द्या".

Pic Credit: https://images.app.goo.gl/h9rvkL3dKNFngbFa9

झालं. इकडे सर्कसीचे खेळ त्या काकाकुवाशिवाय चालू होते आणि तिकडे हा काकाकुवा उंचचउंच भरा-या मारण्याचा सराव करू लागला. सततच्या अथक प्रयत्नांनी त्याला हळू हळू यश येऊ लागलं. त्याला जस जसं उंच उडता येऊ लागलं तस तसं त्यानी आपलं उदिष्ट अजून उंच केलं. तो आता हवेत कसरती करू लागला. ज्या गोष्टी बाकी काकाकुवा तंबुत मंचावर करत असत तो त्याच कसरती दोरी, दांडी, झोपाळा, गाडी ह्या कशाच्याही सहाय्याशिवाय हवेत करू लागला. गिरक्या घेणे, उलट सुलट होणे, झुपकन वर जाणे आणि सुरकन खाली येणे ह्यात तो तरबेज होऊ लागला.


Pic Credit: https://images.app.goo.gl/947vvagpPbwmo1rk6


ह्या सगळ्यावेळात बाकी काकाकुवांनी त्याच्याशी बोलणं टाकलं. तो पुर्ण एकटा पडला. पण त्यानी त्याचा धीर खचू दिला नाही. कारण त्याला हे नक्की ठाऊक होतं की एकदाका त्याला जे करायचय ते साध्य झालं की हेच सारे काकाकुवा त्याला डोक्यावर घेतील.

आणि अखेर तो म्हणत होता तसच झालं.  त्याचा सराईतपणा पाहून मालक कमालीचे खूष झाले. दुस-याच दिवसा पासून बाकी काकाकुवांच्या कसरती नंतर ह्या ध्येयवेड्या काकाकुवाच्या हवेतील कसरती सर्कसीत होऊ लागल्या आणि त्या लोकांनाही प्रचंड आवडू लागल्या. ह्या वेड्या काकाकुवाच्या कसरती पाहायला लोकांची अधिपेक्षा जास्त गर्दी होऊ लागली आणि मालकाला त्याचा प्रचंड फायदा होऊ लागला.

अर्थातच तो काकाकुवा सगळ्या सर्कसीच्या गळ्यातला ताईत बनला.

Pic Credit: https://images.app.goo.gl/X43TUsvhAk55CG9w7

तात्पर्यः १. इतरांपेक्षा वेगळं साध्य करायचं असेल आणि त्यासाठी वाटेल ती मेहनत करायची तयारी असेल तर  जगात काहीही अशक्य नाही.
           २. वेगळा मार्ग चोखाळत असताना आपल्याच लोकांचा विरोध होऊ शकतो तरी स्वतःवरचा विश्वास ढळू  द्यायचा नाही.

______________________________________________________________________________________________________